इराण आणि मध्य पूर्वेतील तणावात भारतात येणारी ६० टक्क्याहून अधिक जहाजे अचानक पब्लिक ट्रॅकिंग सिस्टमवरून गायब होत आहेत. प्रत्यक्षात ही जहाजे...
इराण आणि मध्य पूर्वेतील तणावात भारतात येणारी ६० टक्क्याहून अधिक जहाजे अचानक पब्लिक ट्रॅकिंग सिस्टमवरून गायब होत आहेत. प्रत्यक्षात ही जहाजे कुठे बेपत्ता होत नसून सुरक्षेच्या कारणास्तव ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम(AIS) बंद किंवा मर्यादित करण्यात येत आहे.जेणेकरून या जहाजांचे अचूक लोकेशन ट्रेस करता येऊ शकत नाही.
AIS एक अशी सिस्टिम आहे, जी जहाजांची ओळख, त्याचे लोकेशन, स्पीड आणि संभाव्य ठिकाण याची माहिती देते. त्यातून दुसरी जहाजे, बंदर आणि ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर त्यांच्यावर देखरेख ठेवता येते. परंतु युद्ध अथवा तणावाच्या स्थितीत ही माहिती शेअर करणे जहाजांसाठी धोकादायक आहे.
जहाजांचा संपर्क तुटला आहे का?
केप्लर (Kpler) या सागरी गुप्तचर कंपनीनुसार भारताकडे जाणारी अंदाजे ६२ टक्के तेलवाहू जहाजे आणि मालवाहू जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करताना आपली सार्वजनिक लोकेशन लपवत आहेत. कोणताही संभाव्य हल्ला किंवा घातपात टाळण्यासाठी असे केले जात आहे. परंतु या जहाजांचा संपर्क तुटला आहे असा याचा अर्थ नाही. ही जहाजे नौदल, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या जहाज वाहतूक कंपन्यांशी सुरक्षित संवादाद्वारे सतत संपर्कात असतात. केवळ त्यांची थेट ठिकाणे सार्वजनिकरित्या किंवा वेबसाइटवर दिसत नाहीत.
भारताच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल?
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. जगातील सुमारे २० टक्के तेलाचा व्यापार या सामुद्रधुनीतून होतो. भारतासाठी तिचे महत्त्व आणखी मोठे आहे. कारण देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी जवळपास निम्मे तेल तसेच एलएनजी आणि एलपीजीचा लक्षणीय साठा सौदी अरेबिया, इराक, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमधून याच सामुद्रधुनीतून जातो. सध्या भारताच्या इंधन पुरवठ्यावर फारसा फरक नाही. अलीकडच्या काळात अनेक भारतीय जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ पार करून पुढे आली आहेत. मागील ७२ तासांत ९ जहाजांनी होर्मुझचा रस्ता पार केला आहे. त्यातील ७ जहाजे भारतासाठी सामान घेऊन येत आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.


COMMENTS