उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पुठ्ठा कारखान्यात काम करणाऱ्या तरुण...
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पुठ्ठा कारखान्यात काम करणाऱ्या तरुणाला आपल्याच पत्नीच्या अनैतिक संबंधांचा विरोध करणे महागात पडले आहे.बेडरूममध्ये पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर, दोघांनी मिळून पतीला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता क्रूरतेची सीमा ओलांडत पत्नीने स्वयंपाकघरातून उकळतं तेल आणून पतीच्या अंगावर ओतले. या जीवघेण्या हल्ल्यात पती गंभीररीत्या भाजला असून परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण हा मूळचा शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकैनिया गावचा रहिवासी असून, सध्या सीबीगंज येथील नदौसी गावात भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याचा विवाह बिथरी परिसरातील एका तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. ती सतत त्या तरुणाच्या फोनवर संपर्कात असायची, इतकेच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर रील बनवून पाठवत असे, असा आरोप पतीने केला आहे.
नेहमीप्रमाणे पती कारखान्यातील काम संपवून घरी परतला. मात्र, घराचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय जमिनीला खिळले. त्याची पत्नी बेडरूममध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती. पतीने या गोष्टीला कडाडून विरोध केला. यावरून तिघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.
गळा आवळण्याचा प्रयत्न आणि अंगावर उकळतं तेल
पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी त्याचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. याच दरम्यान पत्नी धावत स्वयंपाकघरात गेली आणि गॅसवर गरम असलेले उकळते तेल आणून थेट पतीच्या अंगावर ओतले. या भीषण हल्ल्यात पतीचा पाय पूर्णपणे होरपळला. गंभीर जखमी अवस्थेत पतीने तिथून कशीबशी सुटका करून घेतली आणि आपले गाव गाठले.
न्यायासाठी पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवले
या घटनेनंतर पीडित तरुण आपल्या आईसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी न करताच त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवले. सीबीगंज पोलीस ठाण्यातही त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. अखेर हताश झालेल्या पतीने थेट बरेलीच्या एसएसपी कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली.
प्रकरण एकतर्फी नाही, दोन्ही बाजूंची चौकशी सुरू: एसएसपी
या संवेदनशील प्रकरणावर बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "हे प्रकरण पूर्णपणे एकतर्फी वाटत नाही. पतीच्या तक्रारीपूर्वी पत्नीनेही पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्या अर्जात तिने पती तिच्यावर विनाकारण संशय घेतो आणि मारहाण करतो, असा आरोप केला आहे." सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून घेतल्या असून, फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


COMMENTS