वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी २४ वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून नि...
वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी २४ वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्ली, दरोगा मशिदीजवळ घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या वडिलांनी जावयावरच हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मंजू संदीप पचारे (२४, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत असल्याने मंजूने त्याचे घर सोडले आणि वडील राजकुमार पारसे यांच्याकडे वारीसपुरा, कामठी येथे राहू लागली. राजकुमार पारसे यांचे शुक्रवार बाजार परिसरात मच्छी विक्रीचे दुकान असून, मंजू शेतमजुरी करून वडिलांना हातभार लावत होती.
मंजूने पती संदीप रामू पचारे याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल २५ जून २०२६ रोजी लागल्याची माहिती तिचे वडील राजकुमार पारसे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मंजू शेतातून काम करून घरी आली. वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हिरणवार गल्लीत अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी तिचा मोबाईल घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पळून गेला. याबाबत माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
माझ्या मुलीचा घात केला, वडिलांचा टाहो
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडील राजकुमार पारसे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांकडे तक्रार देताना, माझ्या मुलीचा घात जावई संदीप रामू पचारे यानेच केला असावा, असा संशय व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा शोध, सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी
अप्पर पोलीस आयुक्त वनिता शाहू, राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त डॉ. निखिल पखाले, सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे तसेच नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत असून आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.


COMMENTS