आळेफाटा : महामार्गावरील प्रवास कधी जीवघेणा ठरेल, याचा नेम नसतो. शुक्रवारी (दि. २६) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आळेफाटा बायपासवर...
आळेफाटा : महामार्गावरील प्रवास कधी जीवघेणा ठरेल, याचा नेम नसतो. शुक्रवारी (दि. २६) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आळेफाटा बायपासवर हृदयाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला. पुण्याच्या दिशेने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले.त्यानंतर कारने महामार्गावर २ ते ३ वेळा पलट्या घेतल्या आणि रस्त्यालगत असलेल्या एका घराच्या पडवीवर जाऊन जोरदार धडक दिली.
अधिकच्या माहितीनुसार, अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आले. कारची अवस्था पाहून आतमध्ये असलेल्या प्रवाशांचे काय झाले असेल, याची भीती सर्वांनाच वाटत होती. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कारमधील जखमींना तातडीने बाहेर काढले.
माणुसकीचे दर्शन; रडणाऱ्या चिमुकल्यांना चॉकलेट देऊन केले शांत
कारमधून दीड वर्षांचे बाळ आणि तीन वर्षांचा मुलगा बाहेर काढण्यात आला. अपघाताचा धक्का आणि आई-वडिलांची अवस्था पाहून दोन्ही मुले घाबरून रडू लागली. अशा वेळी स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत मुलांना चॉकलेट दिले, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला आणि त्यांना शांत केले. या अपघातात तीन वर्षांचा मुलगा पूर्णपणे सुखरूप बचावला, तर दीड वर्षांच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली.
पती-पत्नी गंभीर जखमी; उपचार सुरू
अपघातात कारमधील पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता दोघांनाही तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय या घटनेत आला. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.


COMMENTS