व्हिएतनामची न्गुएन फुओंग आन्ह हिने नेल आर्ट करून कोट्यवधींचा उद्योग उभा केला. आजच्या तारखेला ही तरुणी महिन्याला ७ ते १० लाख रुपयांची कमाई कर...
व्हिएतनामची न्गुएन फुओंग आन्ह हिने नेल आर्ट करून कोट्यवधींचा उद्योग उभा केला. आजच्या तारखेला ही तरुणी महिन्याला ७ ते १० लाख रुपयांची कमाई करत आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणारं शिक्षण जरूर घ्या.पण सोबतच साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे असं एकदा म्हणाले होते. कित्येक वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला हा सल्ला आजही तितकाच लागू पडतो. किंबहुना आजच्या सोशल मीडियाच्या युगात फारसं शिक्षण नसलेले लोकही केवळ आपली कला सादर करून एखाद्या उच्चशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर किंवा इंजिनिअरपेक्षाही जास्त पैसे कमवत आहेत. होय, आता या व्हायरल होत असलेल्या तरुणीलाच पाहा. ती सलूनमध्ये हेल्परचं काम करायची. पण आता नेल आर्ट करून ती महिन्याला तब्बल १० लाख रुपयांची कमाई करत आहे.ही तरुणी आहे तरी कोण?
व्हिएतनाममधील या तरुणीचं नाव न्गुएन फुओंग आन्ह आहे. ही ३२ वर्षीय तरुणी गेली ६ वर्षे दुबईमध्ये नेल आर्ट करत आहे. नेल आर्ट म्हणजे नखांवर विविध प्रकारचे रंग आणि डिझाइन्स करून त्यांना अधिक आकर्षक बनवण्याची कला. महिलांमध्ये सध्या नेल आर्टची प्रचंड क्रेझ आहे. याच गोष्टीचा फायदा घेत न्गुएन फुओंग आन्हने आपल्या कलेचं रूपांतर फुल-टाईम व्यवसायात केलं. सुरुवातीला ती एका सलूनमध्ये हेल्परचं काम करायची. पण हळूहळू तिने तिथे व्यवसाय कसा केला जातो, हे शिकून घेतलं. आता दुबईमध्ये तिचं स्वतःचं आलिशान सलून आहे. तिथे ती फक्त नेल आर्ट करून महिन्याला ३०,००० ते ४०,००० दिरहॅम, म्हणजेच सुमारे ७ ते १० लाख रुपये कमवत आहे.
बिझनेस उभा कसा केला?
द नॅशनलला दिलेल्या मुलाखतीत न्गुएन फुओंग आन्हने आपली यशोगाथा सांगितली. दुबईमध्ये हेल्पर म्हणून काम करत असताना तिने फ्रीलान्स काम करण्यास सुरुवात केली. लोकांना कमी दरात नेल आर्ट करून द्यायची. तसेच त्या नेल आर्टचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायची. हळूहळू ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. तिचे फॉलोअर्स वाढले आणि मुख्य म्हणजे तिची कलात्मकता लोकांना आवडू लागली. त्यामुळे दुबईतील अनेक श्रीमंत महिला तिच्याकडून नेल आर्ट करून घेऊ लागल्या. परिणामी तिचा व्यवसाय झपाट्याने वाढला आणि पुढील दोन-तीन वर्षांत तिने स्वतःचं सलून सुरू केलं. कधीकाळी नोकरी करणारी ही तरुणी आज स्वतःची मालकीण असून लाखो रुपयांची कमाई करत इतरांनाही रोजगार देत आहे.
मुलाखतीच्या शेवटी ती म्हणाली की, आता ती ३२ वर्षांची आहे. पण येत्या २० वर्षांत भरपूर पैसे कमावून तिला निवृत्त व्हायचं आहे. कारण तिने आयुष्यभर संघर्ष केला आहे. उर्वरित आयुष्य तिला शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात जगायचं आहे.




COMMENTS