अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जून २०२० मधील अकाली निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ आला. त्या वेळी रिया आणि...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जून २०२० मधील अकाली निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ आला. त्या वेळी रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. मात्र, जोडीदाराच्या निधनाच्या दुःखातून सावरण्याआधीच रियाला तपासाच्या भोवऱ्यात अडकली आणि त्यानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. ती म्हणाली की, तुरुंगात घालवलेले दिवस अजूनही ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती विसरू शकलेले नाहीत. त्या संपूर्ण अनुभवाने त्यांच्या मनावर खोल जखमा केल्या असून त्याचा परिणाम आजही त्यांच्या आयुष्यावर होत आहे. अंगद बेदी आणि नेहा धूपिया यांच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सध्या ती सिंगल असल्याचं सांगितलं. तिला भविष्यात जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत असं वाटतं? असं विचारण्यात आलं.
रियाला हवा आहे असा जोडीदार
रिया म्हणाली, “सध्या माझी कोणतीही खास अपेक्षा नाही. पण या प्रवासात आपल्याबरोबर कोणाचं तरी असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. जर मला एका शब्दात सांगायचं असेल, तर मला प्रगल्भ विचारांची (Evolved) व्यक्ती आवडेल.” यानंतर रियाला आणि तिथे उपस्थित असलेल्या तिच्या भावाला लग्नाबद्दल त्यांचे काय विचार आहेत याबद्दल विचारण्यात आलं. यावर रिया हसत म्हणाली, “मी माझ्या लहान भावाच्या आधी लग्न करू शकत नाही.” मात्र, यावर शोविकनेही मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला “तिचं लग्न झाल्यावरच मी लग्न करेन.” यावेळी रियाने सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB) केलेल्या अटकेबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. त्या काळातील धक्क्यातून आपण अजूनही पूर्णपणे सावरू शकलेलो नाही, असं ती म्हणाली.
रियाच्या भावालाही सोसावा लागला त्रास
रिया म्हणाली, “अशा गोष्टीतून पूर्णपणे बाहेर पडणं खूप कठीण असतं. तो एक मानसिक आघात (ट्रॉमा) असतो. तो फक्त मनातच नाही, तर शरीरातही कायमचा राहतो.” रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यानेही २०२० नंतर आयुष्यात झालेल्या मोठ्या बदलांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “त्या घटनेपूर्वी मी पूर्णपणे अभ्यासात रमलो होतो. आयआयएम किंवा व्हार्टनसारख्या प्रतिष्ठित संस्थेत एमबीए करण्याचं माझं स्वप्न होतं. पण त्यानंतर सगळंच बदललं. आयुष्य कधी कोणतं वळण घेईल, याचा अंदाज कुणालाच येत नाही. आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलून जातं.”
शोविकने पुढे सांगितलं की, पुन्हा नव्याने उभ राहण्यासाठी चार-पाच वर्षे लागली. तो म्हणाला, “आजही काही दिवस असे असतात, जेव्हा वाटतं हे सगळं खरंच माझ्यासोबत घडलं होतं.” शोविक आणि रिया या दोघांनीही सांगितलं की, त्या काळात झालेल्या त्रासाचा परिणाम आजही त्यांच्या आयुष्यावर होतो. शोविकने सांगितलं की, त्याला अजूनही पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) चा त्रास होतो.
तो म्हणाला, “आजही मला PTSD चा त्रास आहे. कधी अचानक दाराची बेल वाजली तरी त्या दिवसांची आठवण येते. त्या काळात इतकी बिकट परिस्थिती होती की, प्रत्येक वेळी बेल वाजली की कुणीतरी आमच्याकडे येत आहे, अशी भीती वाटायची.” यावर रियानेही भावाच्या म्हणण्याला दुजोरा देत सांगितलं की, “शोविक म्हणतोय तसं, PTSD हा आजही आमच्या आयुष्याचा भाग आहे. त्यासाठी आम्ही थेरपी घेतो आणि हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”
२०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB) अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली होती. या तपासादरम्यान रिया चक्रवर्तीला मुंबईतील भायखळा कारागृहात २८ दिवस तुरुंगात राहावं लागलं तर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती जवळपास ९० दिवस न्यायालयीन कोठडीत होता.


COMMENTS