वाघोली - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद येथील शाश्वत रुग्णालयात घडला. या प्रकरणी त्या महिल...
वाघोली - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना केसनंद येथील शाश्वत रुग्णालयात घडला. या प्रकरणी त्या महिलेचे पती राकेश मोझे यांनी वाघोली पोलिसांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.ही घटना २१ जून रोजी घडली.
दिपाली राकेश मोझे या प्रसूती दरम्यान सात महिने शाश्वत रुग्णालयात उपचार घेत होत्या. २१ जून रोजी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर त्यांना पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांची पाण्याची पिशवी फुटून त्यांना खूप वेदना होऊ लागल्या. तेथील डॉक्टरनी त्यांची नैसर्गिक प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. मात्र नैसर्गिक प्रसूती होत नाही हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन करावे लागेल. असे त्यांच्या पतीला सांगून त्यांच्या सह्या घेतल्या. मात्र सिझेरियनसाठी कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.
तसेच प्रसूतीतज्ञ व भूलतज्ञ यांना बोलविण्यासाठी तेथील डॉक्टरनी ऐनवेळी फोन केले. मात्र तास दीड तास कोणतेही डॉक्टर उपलब्ध झाले नाही. दरम्यानच्या काळात गर्भाशयाची पिशवी फाटली व प्लेसेंटल एब्रप्शन झाले. त्यामुळे बाळाच्या नाका तोंडांत रक्त जाऊन त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली. एक ते दीड तासांनी डॉक्टर आल्यानंतर सिझेरियन करण्यात आले.
बाळाची कोणतीही हालचाल नसल्याने बाळाला पुण्यातील रुग्णालयात रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले. त्या महिलेच्या पतीला रुग्णवाहिकेत बसू दिले नाही. ते दुचाकीवर त्या पुण्यातील रुग्णालयात पोहचले. तेथे डॉक्टरनी बाळाला मृत घोषित केले. यानंतर त्यांनी पुण्यातच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत विचारणा करण्यासाठी मोझे यांचे नातेवाईक गेले असता त्यांना तेथील डॉक्टरनी बाहेरच्या व्यक्तींना बोलावून दमदाटी केली. याबाबत पोलिसात अदखल पात्र गुन्हाही दाखल करण्यात आला. असे तक्रार अर्जात मोझे यांनी नमूद केले आहे.
तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणी सर्वांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. ते घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या कमिटीकडे ते पाठविण्यात येईल. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाघोली पोलिस ठाणे
याबाबत ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली आहे. उद्या त्या संदर्भात चौकशी केली जाईल.
- डॉ. सुरेश गोरे, हवेली तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या बाळाचा जीव गेला आहे. आम्हाला न्याय हवा आहे.
- राकेश मोझे, दिपाली यांचे पती
त्यांना प्रसूती साठी रात्री बोलावले होते. त्या सकाळी आल्या. त्यांना सिझेरियन करावे लागेल हे पूर्वीपासून सांगितले होते. मात्र नैसर्गिक प्रसूती करा असा त्यांचा हट्ट होता. दरम्यानच्या काळात गुंतागुंत होऊन बाळाच्या नाका तोंडांत रक्त गेले. तरी त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र एक दोन तासांनी त्याचा मृत्यू झाला. यात आमची चूक नाही.
- डॉ सविता खरात, संचालक, शाश्वत रुग्णालय


COMMENTS