मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नववधू दागिने आणि पैसे घेऊन आपल्या भावोजी...
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नववधू दागिने आणि पैसे घेऊन आपल्या भावोजीसोबत पसार झाली. संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असताना तिने हे पाऊल उचललं.सकाळी जेव्हा पती आणि कुटुंबाला जाग आली, तेव्हा नवरी गायब होती. इतकंच नाही तर जेव्हा त्यांनी कपाट पाहिलं, तेव्हा ते रिकामं होतं. यानंतर कुटुंब जैसीनगर पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि त्यांनी नववधूविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जैसीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाने पत्नीच्या निधनानंतर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्याची भेट कंदेला येथील रामनारायण नावाच्या मध्यस्थाशी झाली. रामनारायणने त्याला छत्तीसगडमधील मुंगेली येथील रहिवासी असलेल्या रुक्मणीबद्दल सांगितलं. विश्वास संपादन करण्यासाठी रुक्मणीच्या पतीचाही अपघातात मृत्यू झाल्याची खोटी गोष्ट रचली.
लग्न लावून देण्याच्या बदल्यात उकळले १ लाख
मध्यस्थाने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून लग्न लावून देण्याच्या बदल्यात १ लाख २० हजार रुपये उकळले. १९ जून रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, २० जून रोजी रानगीर माता मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार सप्तपदी घेतल्या. २१ जूनच्या रात्री जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होतं, तेव्हाच या नववधूने घरातील कपाटाचं लॉक तोडून त्यात ठेवलेली ३० हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीचा कंबरपट्टा, पैंजण आणि मंगळसूत्र लंपास केलं.
भावोजीसोबत झाली पसार
सकाळी जेव्हा कुटुंबाला जाग आली, तेव्हा नवरी गायब होती आणि कपाट रिकामं होतं. विशेष म्हणजे लग्न समारंभात रुक्मणीसोबत ओडिशाचा रहिवासी असलेला अरविंद नावाचा व्यक्तीही हजर होता, ज्याची ओळख तिने आपला भावोजी म्हणून करून दिली होती. नंतर समोर आलं की, तोच या लुटेरी गँगचा मुख्य सूत्रधार आहे.
रात्री गावात आलेली कार
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री गावात एक संशयास्पद कार दिसली होती. भावोजी अरविंद कार घेऊन आला आणि नवरीला सोबत घेऊन फरार झाल्याचं म्हटलं जात आहे. पीडित कुटुंबाने जैसीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.


COMMENTS