जुन्नर / विशेष प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक जुन्नर तालुक्यामधील बोतार्डे ग्रामपंचायतीचा अत्यंत ढिसाळ आणि मनमानी कारभार समोर आला आह...
जुन्नर / विशेष प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक जुन्नर तालुक्यामधील बोतार्डे ग्रामपंचायतीचा अत्यंत ढिसाळ आणि मनमानी कारभार समोर आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सतिश संतोष शिंदे यांच्या पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रिया आणि मंजुरी संदर्भात दिलेल्या लेखी अर्जाला तब्बल १० महिने उलटून गेले, तरी ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप साधे उत्तरही दिलेले नाही. या प्रकारामुळे जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासन नक्की कोणासाठी काम करतेय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बोतार्डे येथील जागृत नागरिक सतिश संतोष शिंदे यांनी गावातील पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे, या भरतीला पुणे जिल्हा परिषदेची रीतसर मंजुरी आहे का, व यामध्ये भरतीसाठी अर्ज दाखल केलेला होता, याबाबत सविस्तर माहिती मागण्यासाठी १० महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात रीतसर लेखी अर्ज दिला होता. या अर्जाची अधिकृत पोचपावती (शिक्का आणि स्वाक्षरी) देखील सतिश शिंदे यांच्याकडे उपलब्ध आहे.
कायद्याला आणि नागरिकांना जुमानत नाही प्रशासन!
शासकीय नियमांनुसार नागरिकांच्या कोणत्याही अर्जावर अथवा तक्रारीवर १५ ते ३० दिवसांच्या आत योग्य ती कायदेशीर कारवाई करून लेखी उत्तर देणे ग्रामपंचायत प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र, बोतार्डे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सतिश शिंदे यांच्या अर्जाला थेट केराची टोपली दाखवली आहे. १० महिने वारंवार चकरा मारूनही प्रशासनाकडून कोणतीही माहिती न देता केवळ चालढकल केली जात आहे. पाणीपुरवठा सारख्या महत्त्वाच्या विषयावरील कर्मचाऱ्यांची माहिती दडवून ठेवण्यामागे नक्की कोणते गौडबंगाल आहे? असा संशय आता बळावला आहे.
जुन्नर गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) तक्रार करणार; आंदोलनाचा इशारा
या प्रशासकीय निष्काळजीपणामुळे संतप्त झालेले अर्जदार सतिश संतोष शिंदे आता थेट जुन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) लेखी तक्रार दाखल करणार आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. जर पुढील काही दिवसांत या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मिळाली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सतिश शिंदे यांनी दिला आहे.


COMMENTS