अमरावती : पत्रकार, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, हाडाचे प्राध्यापक आणि विदर्भाच्या सिंचन अनुशेषाविरुद्ध विधिमंडळात आवाज उठवणारे 'सिंचन...
अमरावती : पत्रकार, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, हाडाचे प्राध्यापक आणि विदर्भाच्या सिंचन अनुशेषाविरुद्ध विधिमंडळात आवाज उठवणारे 'सिंचन अनुशेष निर्मूलन महर्षी' माजी आमदार प्रा. बी. टी.विधिमंडळउपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ८ वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
अमरावती येथे घरीच सुरू होते उपचार
गेल्या अनेक दिवसांपासून प्रा. बी. टी. देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ होती. वाढत्या वयासोबत उद्भवलेल्या आजारपणामुळे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर अमरावती येथील नवसारी रोडवरील निवासस्थानीच उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अमरावतीच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सलग ३० वर्षे विधान परिषदेत प्रतिनिधित्व; अनोखा विक्रम
प्रा. बी. टी. देशमुख यांनी १९८० ते २०१० या प्रदीर्घ काळात सलग ६ टर्म म्हणजे एकूण ३० वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. सभागृहात कोणताही राजकीय पक्ष पाठीशी नसताना केवळ आपल्या अभ्यासू वृत्तीच्या आणि आकडेवारीच्या जोरावर त्यांनी सरकारला झुकवले. विदर्भावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि सिंचन अनुशेषावर त्यांनी केलेले भाषणे आजही मार्गदर्शक मानली जातात.
'नुटा'चे मुख्य आधारस्तंभ
शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 'नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन' (नुटा) या अत्यंत प्रतिष्ठेच्या संघटनेचे ते प्रदीर्घ काळ मुख्य आधारस्तंभ आणि अध्यक्ष राहिले. 'नुटा'च्या माध्यमातून त्यांनी शिक्षणक्षेत्रातील अनेक जाचक अटी मोडीत काढल्या आणि शिक्षकांचे न्याय्य हक्क मिळवून दिले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.


COMMENTS