कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने ब्रेकअपनंतर रागाच्या भरात आपल्...
कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने ब्रेकअपनंतर रागाच्या भरात आपल्या एक्स-गर्लफ्रेंडचे अपहरण केले आणि त्यानंतर चालत्या कॅबमध्ये स्फोट घडवून स्वतःला संपवले.
या भयंकर घटनेत हा तरुण कारमध्येच जिवंत जळाला असून, महिला आणि कॅब चालक जखमी झाले आहेत.
नुकतेच झाले होचे ब्रेकअप
ही घटना शनिवारी (27 जून) तुमकूर जिल्ह्यातील सिरा तालुक्यातील जोगीहळ्ळीजवळ घडली. नागेंद्र (30) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा अंकोला येथील रहिवासी होता आणि सध्या बेंगलोरमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्र आणि संबंधित महिला हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते आणि नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले होते. ही महिला बेंगलोरच्या संजय गांधी रुग्णालयात ओटी टेक्निशियन म्हणून काम करते. तिने नागेंद्रचा फोन नंबर ब्लॉक केला होता, ज्यामुळे तो प्रचंड संतापला होता.
आधी तुला मारेन अन् मग...
शनिवारी सकाळी नागेंद्र जयनगर येथील महिलेच्या भाड्याच्या घरात पोहोचला. तिथे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर नागेंद्रने तिला जबरदस्तीने एका कॅबमध्ये बसवले आणि तो तिला घेऊन निघाला. या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पालकांनी तातडीने जयनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, इकडे प्रवासादरम्यान नागेंद्रने कॅबमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. 'आधी तुला मारेन आणि नंतर स्वतःला संपवेन', असे तो तिला म्हणाला. पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, नागेंद्रने प्रवासादरम्यान महिलेला पेट्रोल बॉम्बसारखी वस्तूही दाखवली होती.
अचानक कारमध्ये झाला स्फोट
ही कॅब राष्ट्रीय महामार्ग-48 वरून बेंगलोरहून अंकोलाच्या दिशेने जात होती. गाडी जोगीहळ्ळीजवळ पोहोचल्यावर नागेंद्रने महिलेवर चाकूने हल्ला केला. यामुळे घाबरलेल्या कॅब चालकाने (प्रवीण) गाडी थांबवली. याच संधीचा फायदा घेत महिलेने कॅबचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर निसटली. ती बाहेर पडताच काही क्षणांतच कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि गाडी आगीचा गोळा बनली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नागेंद्रचा कारमध्येच जिवंत जळून मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेत महिला आणि कॅब चालक प्रवीण हे दोघेही जखमी झाले असून त्यांना तुमकूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
स्फोट कसा झाला?
या भीषण स्फोटामुळे महामार्गावर तब्बल एक किलोमीटरहून अधिक लांबीची वाहतूक कोंडी झाली होती. तुमकूरचे पोलीस अधीक्षक (SP) अशोक के.व्ही. यांनी सांगितले की, कल्लांबेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आणि घटनास्थळी सापडलेल्या स्फोटक पदार्थांवरून असे दिसते की, नागेंद्रने जाणीवपूर्वक हा स्फोट घडवून आणला आहे. कल्लांबेला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, स्फोट नेमका कसा झाला, त्यात कोणत्या प्रकारची स्फोटके वापरली गेली आणि ती नागेंद्रकडे कुठून आली, या सर्व बाबींचा कसून तपास सध्या सुरू आहे.


COMMENTS