कर्नाटकच्या म्हैसूर मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, लग्नाच्या अवघ्या एका दिवस आधी एका तरुणीने आणि तिच्या पालकांनी विष प्राशन करून जी...
कर्नाटकच्या म्हैसूर मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, लग्नाच्या अवघ्या एका दिवस आधी एका तरुणीने आणि तिच्या पालकांनी विष प्राशन करून जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये या टोकाच्या निर्णयासाठी एका तरुणाला जबाबदार धरण्यात आले आहे.
पोलीस सध्या या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत. मृतांमध्ये ५० वर्षीय शिवन्ना (५०), त्यांची पत्नी नागरत्ना(४५) आणि त्यांची २१ वर्षीय मुलगी रक्षित्ताचा समावेश आहे. हे कुटुंब म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा तालुक्यातील 'हालेकेम्पय्यानहुंडी' गावात राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनीही आपल्या घरी विषारी पदार्थ प्राशन करून जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षित्ताचे लग्न दुसऱ्याच दिवशी होणार होते आणि लग्नाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, लग्नापूर्वीच्या काही दिवसांत हे कुटुंब मानसिक तणावाखाली होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, उल्लास गौडा नावाच्या एका स्थानिक तरुणाला रक्षित्ताशी लग्न करायचे होते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रक्षित्ताचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरले, तेव्हा आरोपीने ते लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. त्याने रक्षित्ताविषयी आक्षेपार्ह माहिती पसरवण्यास सुरुवात केली आणि तिच्या भावी पतीला) मसेजेस आणि फोटो पाठवले,असा आरोप आहे. नियोजित लग्न मोडण्याच्या उद्देशानेच त्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे.
घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये या कुटुंबाच्या आत्महत्येसाठी उल्लास गौडा याला जबाबदार धरण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या चिठ्ठीतील मजकूर पूर्णपणे उघड केलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिठ्ठीची सत्यता आणि त्यातील दावे यांची इतर पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच टी. नरसीपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कुटुंबाला इतके टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी तपास पथक मोबाईल फोन, डिजिटल चॅट्स, संदेश, छायाचित्रे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करत आहे.


COMMENTS