नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादाने अत्यंत भीषण वळण घेतले. नदीच्या काठावर झालेल्या वादामुळे नवरा संतापला. त्याने संतापाच्या भरात आपल्या बायकोची ...
नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादाने अत्यंत भीषण वळण घेतले. नदीच्या काठावर झालेल्या वादामुळे नवरा संतापला. त्याने संतापाच्या भरात आपल्या बायकोची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी आरोपीला आधी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मात्र आता ती शिक्षा कमी करुन सात वर्षांच्या सक्तमजुरीत करण्यात आली आहे. जुलै 2021 मधील ही घटना आहे. बायकोने वापरलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे ही घटना घडल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर खंडपीठाने हा निर्णय दिला.
'तुझ्यासारखे हजार नवरे...'
यापूर्वी, सत्र न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 304 भाग-1 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सरकारी पक्षानुसार, जुलै 2021 च्या रात्री आरोपी त्याची पत्नी किरण हिच्यासोबत नदीच्या घाटावर होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्या दरम्यान पत्नीने, 'तुझ्यासारखे हजार नवरे करू शकते' असे अपमानास्पद शब्द वापरले.
सात महिन्यांची गर्भवती
पत्नीच्या या शब्दांमुळे संतप्त झालेल्या आरोपीने जवळच पडलेल्या दगडाने तिच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये किरणचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मृत महिला सात महिन्यांची गर्भवती होती. विशेष म्हणजे, या घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलीस आणि नातेवाईकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. उच्च न्यायालयाने पुराव्यांची तपासणी करताना स्पष्ट केले की, जर आरोपीचा पूर्वनियोजित हत्येचा हेतू असता, तर त्याने स्वतःहून पोलीस आणि मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली नसती.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात सुधारणा
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, पत्नीच्या कथित अपमानास्पद शब्दांमुळे आरोपीने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि रागाच्या भरात हा गुन्हा घडला. त्यामुळे हे प्रकरण 'हत्ये'च्या श्रेणीत न येता 'सदोष मनुष्यवध' या श्रेणीत येते. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा संदर्भ देत खंडपीठाने स्पष्ट केले की, गंभीर आणि अचानक प्रक्षोभ निर्माण होण्याच्या परिस्थितीत गुन्ह्याच्या स्वरूपाचे वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केले जाऊ शकते. याच आधारावर, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात सुधारणा करत आरोपीचा गुन्हा कलम 304 भाग-2 अंतर्गत निश्चित केला आणि त्याला 7 वर्षांची सक्तमजुरी व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे उच्च न्यायालयाने आरोपीचे अपील अंशतः मंजूर केले.


COMMENTS