Omraje Nimbalkar Dharashiv News: मागील काही दिवसांपासून धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आ...
Omraje Nimbalkar Dharashiv News: मागील काही दिवसांपासून धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांमध्ये त्यांचंही नाव आहे.ते लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचं बोललं जातंय. ओमराजे निंबाळकर यांना आपल्या बाजुला ओढण्यासाठी शिंदे गटाकडून देखील शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहे. १७ जून रोजी ओमराजे चार्टर्ड विमानाने दिल्लीला देखील जाऊन आले.
त्यांनी दिल्ली दौरा करताच तेही फुटीर गटासोबत असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र शनिवारी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी अजून काहीही निर्णय घेतला नाही. पक्ष सोडला नाही. मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलेन, मगच निर्णय घेईल, असं वक्तव्य ओमराजे यांनी केलं.
ओमराजे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे आमदार वरुण देसाई आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही ओमराजेंची भेट घेतली. दोन्ही आमदारांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता अखेर ओमराजे यांच्या पक्षांतराबाबत सस्पेन्स संपवला आहे.
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा फोनवरून संवाद झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतली. त्यांचे नेमकं म्हणणं काय आहे? हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं. यावेळी ओमराजे यांनी आपण पक्षासोबत असल्याचं ठाकरेंना सांगितल्याची माहिती आहे. आपण कुठलाही निर्णय घेतला नाही, असंही ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.
"आपणच मला मोठं केलं आहे. आज मी खासदार आहे ते पक्षामुळे... तुमच्यामुळे... त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे," असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती. ओमराजे यांच्या या भूमिकेमुळे आता थेट एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर धोक्यात आल्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर पुन्हा ठाकरे गटाकडे फिरले, तर इतर फुटीर खासदारांकडे दोन तृतीयांश संख्याबळ राहणार नाही. परिणामी इतर पाच खासदारांना पुन्हा ठाकरे गटात परतावं लागेल किंवा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवलं जाऊ शकतं.


COMMENTS