अमेरिका आणि इराण यांच्यात करारानंतर ६० दिवसांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या असताना, अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभाग...
अमेरिका आणि इराण यांच्यात करारानंतर ६० दिवसांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या असताना, अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहानेदेखील इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबविण्यासाठी मांडण्यात आलेला ठराव मंजूर केला आहे.५० विरुद्ध ४८ मतांनी मंगळवारी हा ठराव मंजूर झाला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. 'सिनेट'ने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करण्याची ही दहावी वेळ आहे.
'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या सुझान कॉलिन्स, लिसा मुरकोव्स्की, बिल कॅसिडी आणि रँड पॉल यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन फेटरमन यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला संसदेच्या कनिष्ठ सभागृहानेदेखील या ठरावाला मंजुरी दिली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा ठराव मंजूर झाला असला, तरी ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी धोरणावर याचा नेमका काय परिणाम होईल, हे अद्याप अस्पष्ट आहे, असे 'ब्लूमबर्ग'च्या वृत्तात म्हटले आहे.
संरक्षण विभागाची मागणी
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने इराण युद्धासाठी आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यासाठी अमेरिकी काँग्रेसकडे ८० अब्ज डॉलरची मागणी केली आहे. दुसरीकडे, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत वाटाघाटी करत असताना, अध्यक्ष ट्रम्प या आठवड्यात रिपब्लिकन सिनेटरची भेट घेणार आहेत. इराणच्या पुनर्निर्मितीसाठी ३०० अब्ज डॉलर्सच्या निधीला रिपब्लिकन सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा निधी २०१५ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या १.७ अब्ज डॉलर्सपेक्षा कितीतरी पतीने जास्त आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्राईलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यापासून डेमोक्रॅट्स सातत्याने या युद्धावर मतदानासाठी दबाव आणत आहेत.
हा तर शत्रूला पाठिंबा : डोनाल्ड ट्रम्प
ठरावानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''मी इराणला कमकुवत स्थितीत आणले असून तो कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळी अमेरिकन सिनेटने चुकीच्या वेळी आणि निरर्थक अशा युद्धाधिकार विधेयकावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. असे करून त्यांनी शत्रूला मदत आणि पाठिंबा दिला आहे. चार पराभूत रिपब्लिकन सिनेटरांनी डेमोक्रॅट्ससोबत मतदान केले आहे, हे योग्य नाही. या सिनेटरांनी माझे काम अधिक कठीण केले आहे. मात्र, मी कोणत्याही परिस्थितीत हे पूर्ण करणार आहे, कारण मी नेहमीच माझे काम पूर्ण करतो.''


COMMENTS