सोमवारी (ता. २९) अमरावतीत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची...
सोमवारी (ता. २९) अमरावतीत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, उर्वरित राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
कोल्हापूर :माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दुपारी तीननंतर जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाचे पुनरागमन झाले. धरणक्षेत्रातही जोरदार पावसाला प्रारंभ झाला.रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील पाच दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, काल शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
वळिवाने ओढ दिल्यानंतर सर्वांच्या नजरा माॅन्सूनकडे लागल्या होत्या. माॅन्सूनचा जिल्ह्यात प्रवेशही काहीसा उशिरा झाला. जूनच्या पंधरावड्यानंतर माॅन्सूनचे ढग आले. मात्र, एक दिवस पाऊस पडला. त्यानंतर पावसाने दडी मारली. एखाद्या सरीचा अपवाद वगळता फारसा पाऊस झाला नाही. गेल्या दोन दिवसांत तर १ मिमी पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले. मात्र, हवामान विभागाने दिलेला अंदाज आज तंतोतंत खरा ठरला. रविवारी दुपारी तीन वाजता जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाला सुरुवात झाली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या भागात जोरदार पाऊस पडला. आजरा, चंदगड परिसरात हलक्या सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.
माजगावसह परिसरात दमदार हजेरी
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या पावसाने पन्हाळा तालुक्यातील माजगावसह परिसरात अखेर दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारपासून दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
आजरा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतीच्या कामे पुन्हा सुरू झाली आहेत. खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. शेतकरी दमदार पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आहे. पश्चिम भागात धनगरमोळा, किटवडे, आंबाडे, गवसे परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.
गगनबावड्यात रात्री उशिरापर्यंत पाऊस
गगनबावडा : रविवारी दुपारनंतर गगनबावडा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.
रताळी, भुईमुगाची पेरणी सुरू होणार
शाहूवाडी : साडेसहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत होता. रताळी, भुईमूगसह अन्य पिकांची विशेष करून तालुक्याच्या पश्चिम भागात लांबलेली पेरणी आता करता येणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होऊ लागले आहे.
पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले - पोर्ले परिसरात चार दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज सायंकाळी सहा वाजता दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
राधानगरी तालुक्यात दुपारपासून संततधार
राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारपासून संततधार सुरुवात केल्याने बळीराजाला आशेचा किरण सापडला आहे.
शहर तुंबले
शहर आणि परिसरात अवघ्या तासाभराच्या पावसाने शहर तुंबले. ताराराणी पुतळा ते स्टँड रस्त्यावर पाणी साचले. जयंती नाल्यावरील पुलावर पाणी साचल्याने वाहने चावणे अवघड झाले. मेरीवेदर ग्राउंडच्या समोरील रस्त्यावर पाणी साठले. त्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू केली. लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्येही पाणी साचले. उपनगरातही सखल भागात पाणी साचल्याने नारगरिकांना वाहने चालवताना अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.
दरम्यान, रायगड, सिंधुदुर्गमध्ये जोरदार सरी कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. रायगडमधील चरी परिसरात सर्वाधिक पाऊस झाला असून, अलिबाग व रामराज परिसरातही चांगला पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वैभववाडी, वालावल, आचरा, आंबेरी, पिंगळी, वेतोरे आणि परिसरात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.


COMMENTS