विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी १ जुलै (बुधवारी) रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी आज उपसभापतीपदासाठी अर्ज सादर करताना मोठा ट्विस्ट पाहाय...
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी १ जुलै (बुधवारी) रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी आज उपसभापतीपदासाठी अर्ज सादर करताना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.ठाकरे सेनेचे आमदार असलेल्या सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या पदासाठी अर्ज दाखल केला. यामुळे आठ ते दहा दिवसांत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या सेनेला दुसरा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. यानंतर ठाकरे सेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. “हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही. देशाच्या राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार एकटा व्यक्ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात कसा काय जाऊ शकतो? त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी. कायद्याने ते अपात्र व्हायला हवेत. त्यामुळे समाजाने आता विचार करावा”, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
“सचिन अहिर यांची विधानपरिषदेची टर्म संपणार आहे. त्यामुळे ते तिकडे जाऊन आमदारकी मिळवणार आहेत. तसेच उपसभापतीपदही त्यांनी पदरात पाडून घेतले. ही एकप्रकारची सौदेबाजी आहे. याला बंडखोरी नाही तर विकाऊ आमदार म्हणतात. ही सरळ सरळ गद्दारी आहे. अक्षरशः बाजार मांडला गेला आहे”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे आणि वांद्रे विधानसभेचे आमदार वरूण सरदेसाई यांनाही याबाबत विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवले. आदित्य ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत भूमिका मांडतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दुसरीकडे भांडुपचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेने याआधीही असे अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे हा काही आमच्यासाठी मोठा धक्का नाही. सचिन अहिर हे काही मास लीडर नव्हते”, असे राऊत म्हणाले.
दरम्यान या प्रकरणावर आदित्य ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया देणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.


COMMENTS