नागपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान पोलिओ डोसच्या व्हायलचे सील काढण्यासाठी पुरविण्यात आलेल्या कटरमुळे अनेक परिचारिकांची बोटे कापल्...
नागपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान पोलिओ डोसच्या व्हायलचे सील काढण्यासाठी पुरविण्यात आलेल्या कटरमुळे अनेक परिचारिकांची बोटे कापल्याचा प्रकार समोर आला आहे.कटरनेही व्हायलचे सील सहज निघत नसल्याने एका परिचारिकेने अखेर दाताने सील तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची तक्रार झाल्याने परिचारिकांमध्ये नाराजी पसरली.
रविवारी पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर बालकांना पोलिओचे डोस देण्याचे काम सुरू होते. परंतु व्हायलवरील स्टीलचे सील उघडण्यासाठी कटर देण्यात आले होते. मात्र, हा कटर प्रभावी नसल्याने अनेकांना सील उघडताना अडचणी आल्या. काही परिचारिकांच्या हाताची बोटे कापल्याचेही समोर आले आहे. मनपाच्या कुंजीलालपेठ येथील आरोग्य केंद्रावरही हा प्रकार घडला. येथील परिचारिकेने सांगितले की, कटरने अनेक प्रयत्न करूनही सील निघत नव्हते. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून दाताने स्टीलचे सील सैल केले. त्यानंतर सील हाताने काढले. व्हायलमधील औषधाला कोणताही स्पर्श झालेला नव्हता, कारण स्टीलच्या सीलखाली रबरी बूच पक्के बसलेले होते. बूच हाताने उघडून संबंधित बालकाला पोलिओचा डोस देण्यात आला.
परिचारिके ने पालकाची माफीही मागितली
दाताने सील तोडण्याचा प्रयत्न हा नियमबाह्य असल्याचे संबंधित परिचारिकेने मान्य केले. मात्र, त्यामुळे औषध दूषित झाले नसल्याचा तिचा दावा आहे. तिच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकार हा कामाच्या प्रचंड ताणात घडला असून त्यामागे कोणताही निष्काळजीपणा किंवा गैरहेतू नव्हता. तक्रार झाल्यानंतर संबंधित पालकांची माफीही मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, डोस देताना तक्रारदाराने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. मात्र, नंतर या प्रकाराची तक्रार करण्यात आली. आरोग्य केंद्र प्रशासनाने या प्रकाराची दखल संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कुंजीलालपेठ केंद्रावर ७००हून अधिक बालकांना डोस
दरम्यान, कुंजीलालपेठ आरोग्य केंद्रावर दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ७०० हून अधिक बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. वाढती गर्दी, वेळेचे दडपण आणि व्हायल उघडण्यासाठी उपलब्ध कटर निकृष्ट असल्याने ही घटना घडल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे. या घटनेमुळे पल्स पोलिओ मोहिमेसाठी पुरविण्यात येणाºया साहित्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोग्य कर्मचाºयांना सुरक्षित व दर्जेदार उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.


COMMENTS