Crime News : एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आठव...
Crime News : एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या या निष्पाप मुलीला तिच्याच एका मैत्रिणी असलेल्या सिमरन तमांग हिने गोड बोलून आणि विश्वासात घेऊन घराबाहेर बोलावले होते.सिमरनने तिला एका चारचाकी वाहनात बसवून दारू पाजली आणि ती बेशुद्ध पडताच तिला दुर्गापूरच्या सिटी सेंटर परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या राज मल्लिक आणि शेख अजारुद्दीन या नराधमांनी आणि त्यांच्या साथीदारांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केले.
पीडित मुलीला बायपासजवळ बेशुद्ध अवस्थेत सोडलं
हा अमानवीय प्रकार घडवून आणल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला बायपासजवळ बेशुद्ध अवस्थेत बेवारस सोडून पळ काढला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही बाब एका ड्रायव्हरच्या लक्षात आली. त्याने माणुसकी दाखवत तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवले. आपल्या मुलीची दयनीय अवस्था पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर, दुर्गापूर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी पोलीस आयुक्त प्रणव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुख्य सूत्रधार सिमरन तमांग, राज मल्लिक, शेख अजारुद्दीन आणि हॉटेल मॅनेजर अशा चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कटातील आणखी एक संशयित आरोपी एस. के. दास अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. फॉरेंसिक टीमने हॉटेलमधील खोली आणि घटनास्थळ येथून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पीडितेची वैद्यकीय तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप असून, भाजप नेत्यांसह स्थानिक नागरिक आरोपींना कठोर शासन किंवा एनकाउंटर करण्याची मागणी करत आहेत.
गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मागणी
पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडण्याचे धाडस कोणीही करणार नाही. भाजपचे स्थानिक नेते पारिजात गांगुली यांनीही या गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करत पोलीस यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीला पकडण्यासाठी विविध ठिकाणांवर छापेमारी करत असून, या खळबळजनक प्रकरणाची चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे. समाजातील सुरक्षेच्या दृष्टीने आणि अशा घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.


COMMENTS