२००० च्या सुरुवातीच्या काळात भारतीय सिनेमा एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात होता. हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत असतानाच इंग्रजी भाषेतील...
२००० च्या सुरुवातीच्या काळात भारतीय सिनेमा एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात होता. हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत असतानाच इंग्रजी भाषेतील भारतीय चित्रपटांना पसंती मिळू लागली होती.'मॉन्सून वेडिंग', 'बॉलीवूड कॉलिंग' आणि 'हैदराबाद ब्लूज' सारखे चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत होते. याच काळात अभिनेत्री पेरिझाद झोराबियन हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पेरिझादचं करिअर अल्पकालीन होतं, पण तिने इंडस्ट्रीवर आपली छाप सोडली. तिने अमिताभ बच्चन, शबाना आझमी, व्हिक्टर बॅनर्जी, ओम पुरीसारख्या दिग्गजांबरोबर काम केलं. शेवटी चित्रपट सोडून ती तिच्या वडिलांच्या पोल्ट्री व्यवसाय सांभाळू लागली. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२० कोटी रुपये आहे.
पेरिझाद मुंबईतील एका इराणी कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिच्या वडिलांप्रमाणेच तिलाही लहानपणापासून एक उद्योजक व्हायचं होतं. भारतात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पेरिझादने न्यूयॉर्कमधून एमबीए पूर्ण केलं. तिथे तिची एक मैत्रीण 'ली स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये शिकत होती. पेरिझादला त्याबद्दल समजलं. मग एमबीए केल्यानंतर तिने त्या इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्ष अभिनयाचे धडे गिरवले. तिच्या वडिलांचा यासाठी तिला पाठिंबा होता. पेरिझाद भारतात परतल्यावर तिच्या वडिलांच्या 'झोराबियन्स चिकन्स' या व्यवसायात काम करू लागली. पण नियतीच्या मनात पेरिझादसाठी वेगळे प्लॅन्स होते.
एका कौटुंबिक कार्यक्रमात एका मॉडेल कोऑर्डिनेटरने पेरिझादला पाहिलं आणि तिला 'फेअर अँड लव्हली'ची पहिली जाहिरात ऑफर केली. नंतर तिला अनेक संधी मिळाल्या आणि मग नागेश कुकुनूर यांचा 'बॉलीवूड कॉलिंग' हा चित्रपट मिळाला. पेरिझादने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिच्या वडिलांच्या ऑफिसमधून एक महिन्याची रजा घेतली. मात्र, पुढील दोन वर्षे हा चित्रपट रिलीज झाला नाही, त्यामुळे तिने तिच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणं सुरूच ठेवले. अखेर चित्रपटाच्या पोस्टवर झळकल्यानंतर पेरिझादचं आयुष्य बदललं.
"संजय दत्तसमोर सलमानची बोलती बंद होते, त्याच्या तोंडून चकार निघत नाही…"
'मला करिश्मा कपूरसारखी लोकप्रियता किंवा अटेंशन मिळणार नव्हते'
पेरिझादने सांगितलं की तो चित्रपटांसाठी एक चांगला काळ होता. त्या काळात भारतात इंग्रजी भाषेतील चित्रपट खूप कमी प्रमाणात बनायचे, त्यामुळे अशा भूमिकांसाठी कलाकारही मर्यादित होते. परिणामी पेरिझादला अभिनेत्री व्हायचं नसूनही निर्माते स्वतः मुख्य भूमिका घेऊन तिच्याकडे यायचे. तिने 'मॉर्निंग रागा', 'जॉगर्स पार्क' आणि 'मुंबई मॅटिनी' सारखे चित्रपट केले. पेरिझादला यश मिळत होतं पण मोठ्या स्टार्ससारखे स्टारडम आपल्याला मिळणार नाही, याची तिला पूर्ण जाणीव होती. ती म्हणाली, "मी काही बॉलीवूडची मोठी स्टार नव्हते. मला करिश्मा कपूरसारखी लोकप्रियता किंवा अटेंशन मिळणार नव्हते."
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम, चिनी चित्रपटही केला
त्या काळात पेरिझाद आपल्या वडिलांचा 'झोराबियन्स चिकन्स'चा व्यवसाय आणि तिचे चित्रपट अशा दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला या दोन्हीपैकी एक गोष्ट निवडायला सांगितलं. तिने चित्रपट निवडले आणि तिच्या वडिलांनी तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. पुढे पेरिझादने 'एक अजनबी' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं, तसेच 'हम परदेसी हो गये' या अत्यंत लोकप्रिय मालिकेतही ती दिसली होती. २००४ मध्ये तिने 'बांडुंग सोनाटा' नावाचा एक चिनी चित्रपट केला. यात तिने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती; या चित्रपटासाठी ती चीनमध्ये तीन महिने राहिली होती.
Video: "मला एक छोटा…", अखेर समांथा रूथ प्रभूने स्वतः दिली गुड न्यूज! 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म
पतीचं ते वक्तव्य अन् पेरिझादने इंडस्ट्री सोडली
पेरिझादने ३३ व्या वर्षी लग्न केलं आणि चित्रपटाला रामराम ठोकला. हा निर्णय तिने तिचे पती बोमन इराणी (अभिनेते नव्हे, तर दुसरे बोमन इराणी) यांच्यामुळे घेतला होता. पेरिझाद म्हणाली, "माझा नवरा म्हणाला होता, 'आपलं लग्न झाल्यावर तू जास्त प्रवास करू नये असं मला वाटतं'. यावर माझी आई म्हणाली, 'काय मूर्खपणा आहे. तो असं कसा काय म्हणू शकतो?' तर माझी वहिनी म्हणाली, 'मग लग्नच करू नको. तू एक अभिनेत्री आहेस हे त्याला आधीच माहीत होतं, मग शेवटच्या क्षणी तो असं कसं बोलू शकतो?'"
पेरिझाद म्हणाली, "त्याने 'तू प्रवास करायचाच नाहीस' असं म्हटलं नव्हतं. तो म्हणाला होता, 'मी तुझी वाट पाहीन, पण तू जास्त प्रवास नाही केला तर ते मला आवडेल'. त्यानंतर मी एकही चित्रपट स्वीकारला नाही." सुकेतु शाह यांच्याशी बोलताना पेरिझादने सांगितलं की, तिचं वय वाढत होतं आणि तिला मुलं हवी होती, त्यामुळे तिने इंडस्ट्री सोडायचा निर्णय घेतला. ३४ व्या वर्षी ती पहिल्यांदा आई झाली. त्यानंतर तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं.
समाप्त…; ४ वर्षांनी लोकप्रिय मालिका संपणार! शशांक केतकरने शेअर केला फोटो, 'असा' होणार शेवट, चाहते झाले भावुक
पेरिझादने नाकारल्या ऑफर्स
पेरिझादने त्या काळात चित्रपटांच्या अनेक मोठ्या ऑफर्स नाकारल्या होत्या. सुभाष घई यांनी तिला अनिल कपूरबरोबर 'ब्लॅक अँड व्हाईट' चित्रपटाची ऑफर दिली होती, तसेच निखिल अडवाणी यांच्या 'सलामे-इश्क' चित्रपटात सोहेल खानसोबत काम करण्याची ऑफरही तिच्याकडे होती; पण पेरिझादने या दोन्ही ऑफर्स नाकारल्या. "माझ्या आईने माझ्या पतीला म्हटलं होतं, 'ती एक फुलपाखरू आहे. तिचे पंख कापू नकोस, नाहीतर ती कोमेजून जाईल आणि मरून जाईल'," असं पेरिझादने सांगितलं.
लग्नानंतर पेरिझादने थिएटर केले, मालिका केल्या. तिला दोन मुलं झाली. त्यानंतर तिचा बिझनेसमध्ये रस वाढू लागला. तिच्या वडिलांचा बिझनेस कर्जात बुडाल्यावर तिने त्यांच्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला.
कंपनीची १२० कोटी रुपयांची उलाढाल
तिच्या वडिलांनी होलसेल कंपनी म्हणून सुरू केलेला व्यवसाय आता रिटेल, क्विक कॉमर्स आणि रेडी-टू-कुक या क्षेत्रातही मोठा विस्तार झाला आहे. पेरिझादच्या कंपनीत सध्या ७०० लोक काम करत असून कंपनीची वार्षिक उलाढाल १२० कोटी रुपये आहे. पेरिझादला तिच्या उत्पादनांचा खूप अभिमान आहे. ती स्वतः रोज चिकन खाते, पण जर ती बाहेर कुठे गेली असेल, तर मात्र चिकन खाणं टाळते.
इंडस्ट्रीतील मोठ्या ब्रँड्सबरोबर आपली कोणतीही स्पर्धा नसल्याचं तिने सांगितलं, कारण तिची कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत नाही. ती म्हणाली, "मी एक उत्तम, विशिष्ट ग्राहकांसाठी असलेला, दर्जेदार ब्रँड चालवत आहे." पेरिझादला तिचं काम खूप आवडतं, त्यामुळे ती मुलांना फार वेळ देऊ शकत नाही, याची तिला खंत वाटते.
पेरिझाद चित्रपटांमध्ये कमबॅक करणार का?
पेरिझादचा सध्या अभिनयात परतण्याचा कोणताही विचार नाही. 'ऑल अबाऊट इव्ह' या यूट्यूब चॅनेलशी बोलताना ती म्हणाली की आता तिला अशाच भूमिका करायच्या आहेत, ज्या फावल्या वेळेत करता येतील. कारण तिच्याकडे चित्रपटाच्या सेटवर घालवण्यासाठी वेळ नाही. पण भविष्यात जर एखादी चांगली आणि अर्थपूर्ण भूमिका आली, तर ती नक्कीच करेल.


COMMENTS