या हंगामात विविध आरोग्य समस्या आणि संसर्गाचा धोका वाढत असतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांची वेगाने वाढ होत असते ज्या...
या हंगामात विविध आरोग्य समस्या आणि संसर्गाचा धोका वाढत असतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांची वेगाने वाढ होत असते ज्यामुळे काहींना अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार आणि संसर्गाचा धोका वाढतो. अशा अनेक कारणाने आपल्याला आजार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराबाबत विशेष खबरदारी घेणे उचित आहे. तसेच पावसाळ्यात काहीजण कोणताही विचार न करता काही विशिष्ट पदार्थ खातात, ज्याचे पावसाळ्यात त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
याचा अर्थ असा नाही की याचे परिणाम प्रत्येकावर सारखेच होतील, परंतु या ऋतूत चांगली स्वच्छता आणि आरोग्यदायी आहार राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाहेर जेवणे, वस्तू जास्त वेळ उघड्यावर ठेवणे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे काही लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, या ऋतूत अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात कोणते पदार्थांचे सेवन करणे टाळावेत , कोणत्या लक्षणांना दुर्लक्ष करू नयेत आणि निरोगी राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
पावसाळ्यात कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळावेत?
पावसाळ्यात रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ, आधीच कापलेली फळे, शिळे अन्न आणि जास्त वेळ बाहेर ठेवलेले पदार्थ खाणे टाळावे. कच्चे सॅलड, अर्धवट शिजवलेले मांस आणि न धुतलेली फळे व भाज्या खाल्ल्यानेही संसर्गाचा धोका वाढू शकतो. या हंगामात जास्त प्रमाणात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे, ताजे, घरी बनवलेले अन्न खा. एखादा पदार्थ व्यवस्थित शिजवून स्वच्छ डब्यांमध्ये साठवणे देखील महत्त्वाचे आहे. एखाद्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबद्दल शंका असल्यास, त्याचे सेवन टाळणेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल.
पावसाळ्यात कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
पावसाळ्यात तुम्हाला वारंवार पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोट फुगणे, ताप, अशक्तपणा किंवा भूक न लागणे यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही प्रकरणांमध्ये ही संसर्ग किंवा अन्न विषबाधेची लक्षणे असू शकतात.
याव्यतिरिक्त जर तुम्हाला डिहायड्रेशन, सततचा थकवा किंवा जास्त दिवस याच समस्या व लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर उपचार केल्यास मोठ्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
पावसाळ्यात नेहमी ताजे, घरी बनवलेले जेवण खा. जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर आपले हात स्वच्छ धुवा आणि भरपूर पाणी प्या. फळे आणि भाज्या पूर्णपणे स्वच्छ धुतल्यानंतरच त्यांचा वापर करा.
याव्यतिरिक्त, बाहेरचे खाणे टाळा. पुरेशी झोप घ्या आणि स्वच्छतेची काळजी घ्या. साध्या खबरदारी घेतल्यास पावसाळ्यात अनेक आरोग्य समस्या टाळता येतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
🧘 आरोग्य & लाइफ स्टाइल


COMMENTS