राम मंदिर देणगी चोरी आणि पैशांचा दुरुपयोग केल्या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्य...
राम मंदिर देणगी चोरी आणि पैशांचा दुरुपयोग केल्या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारलं की, या प्रकरणी इतकी घाई का आहे?नंतर सुनावणी झाल्यानं आभाळ कोसळणार आहे का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे नियमित सुनावणी सुट्टी संपल्यानंतरच शक्य आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सुनावणी १२ जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी वकील अनुप अवस्थी यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत आरोप केला की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या धन आणि मंदिरात दान म्हणून आलेल्या दागिन्यांचा अपहार झाला आहे.
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करून हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावं अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. याचिकेत असंही म्हटलंय की, सीबीआय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी. यामुळे प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे होऊ शकेल. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सखोल चौकशीची आवश्यकता याचिकाकर्त्याने व्यक्त केलीय.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणीला नकार दिला आहे. सुट्ट्या संपल्यानंतर नियमित पीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. तोपर्यंत या प्रकरणी सीबीआय़ चौकशी किंवा एफआयआरबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.
अटकेतील आरोपींच्या घरांवर छापे
राम मंदिरामधील देणग्यांच्या कथित अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही जणांच्या घरांवर अयोध्या पोलिसांनी रविवारी एकाचवेळी छापे घातले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. स्थानिक दंडाधिकाऱ्यांसह पोलिस पथकांनी आरोपी अनुकल्प मिश्रा, मनिषकुमार यादव, करुणेश पांडे, लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, राम शंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव, आणि रमाशंकर यादव यांच्या घरांची झडती घेतली, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी झालेल्या झडतीदरम्यान आरोपी मनीष यादव याच्या बंद घराचे कुलूप कुटुंबीयांकडून उघडून घेतल्यानंतर पोलिसांनी तेथून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेशी संबंधित तपशिलांसह कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच रमाशंकर ऊर्फ टिन्नू यादव याच्यासह इतर आरोपींच्या घरांवरही छापे घालत झडती घेण्यात आली.


COMMENTS