राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात सारथी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मराठा समाजात...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात सारथी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मराठा समाजातील यूपीएससी, एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सारथीच्या वतीने आयोजित केला होता.याच कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांचं नाराजीनाट्य घडलं आहे. त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात कार्यक्रम सोडून निघून जाणं पसंत केलं.
शुक्रवारच्या नियोजित कार्यक्रमासाठी काही मंत्री अनुपस्थित होते. त्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी पुढच्या रांगेत बसणार होत्या. परंतु त्यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी रोखलं आणि मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका, नाहीतर वाद उभा राहिल, अशा शब्दांत अपमान केल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे.
काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
''नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्यावं, अशी माझी इच्छा होती. मात्र अभिमन्यू पवार यांना वाटत होतं की ते स्वतः पुढे बसतील. खरंतर त्या ठिकाणी कार्यक्रम हा अतिशय अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा होता आणि त्यांना साथ देणाऱ्या सारथी संस्थेचा होता. माझ्या जातीला चुकीच्या पद्धतीने ट्रीट करुन गालबोट लावलं आहे. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढे बसू नका. त्यामुळे वाद निर्माण होईल.'' अशा शब्दांत मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवारांवर आरोप केले.
मेधा पुढे म्हणाल्या की, एका ठिकाणी नरेंद्र पाटील आणि दुसऱ्या ठिकाणी अधिकारी म्हणत होते तुम्ही बसा.. कारण मी खासदार आहे, स्थानिक आहे, माझ्याकडे डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी कमिटीचं चेअरपर्सन पद आहे. मात्र अभिमन्यू पवारांना ते नको होतं. फक्त मराठा समाजाचे लोक पुढे बसतील, असं त्यांचं म्हणणं होतं.
मेधा कुलकर्णींनी आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, अभिमन्यू पवार सगळीकडे फिरुन हे सांगत होते की मी बसतो, मी बसतो. सगळे त्या ठिकाणी होते. नरेंद्र पाटलांनी पुढे बसावं, हेच मी म्हणत होते. नको त्या गोष्टीला आपण महत्व द्यायला नको. परंतु त्यांचं बोलणं चुकीचं होतं. कारण सर्व समाजाला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मला टार्गेट केलं, त्यामुळे मी तिथून निघून गेले. मी जर तिथे अपेक्षितच नसेल आणि माझ्यामुळे वाद निर्माण होणार असेल, तर तिथे थांबून काहीच फायदा नाही.
काय म्हणाले अभिमन्यू पवार?
''ताईंचा गैरसमज झालेला आहे. नरेंद्र पाटील पुढे बसतील आणि आपण आमदार-खासदार मागे बसू असंच केवळ मी म्हटलो आहे. बाजूला दाभोळकर, राजूकर, योगेशण्णा होतो.. सगळ्यांना विचारा.'' अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.


COMMENTS