शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विलिनीकर...
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाबाहेर आज माध्यमांशी बोलताना सांगितले.काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी विलिनीकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीने हा दावा फेटाळून लावला. आता वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
नाना पटोले यांच्यानंतर वडेट्टीवारांचे वक्तव्य
"शरद पवारांकडून राष्ट्रवादी विलिनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता पण, काही कारणास्तव त्याला विलंब झाला", असा खुलासा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. "समविचारी पक्ष एकत्र देण्याची प्रक्रिया देश पातळीवर सुरु झाली असून, त्याचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) विलिनीकरणाचा विचार करत आहेत", असे पटोले म्हणाले होते. यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी देखील विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
नक्की काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“शरद पवारांचा पक्ष हा सेक्युलर विचारांचा पक्ष आहे. भाजपाबरोबर गेलेला (अजित पवारांची राष्ट्रवादी) सेक्युलर नाही. धर्मांध शक्तीबरोबर जाणारे सेक्युलर असू शकत नाहीत, फुले-शाहू-आंबेडकर मानणारे असू शकत नाहीत. पण, शरद पवार सेक्युलर विचारासाठी काम करत आहेत, त्यामुळे सत्तेपासून दूर राहून ते त्या विचारासाठी काम करत आहेत. त्यांचे विचार काँग्रेसशी मिळतेजुळते असल्याने पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत हायकमांड चर्चा करत आहे. याचे सकारात्मक परिणाम येतील आणि काँग्रेस एका विचाराने पुन्हा उभी राहिल असा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा; सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे काय म्हणाले?
शशिकांत शिंदेंनी फेटाळला होता दावा
विलिनीकरणाबाबत नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या दाव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले होते. शशिकांत शिंदे यांनी पटोलेंचा विलिनीकरणाचा दावा फेटाळून लावला होता. "काँग्रेसकडून कधीच विलिनीकरणाचा प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांकडून माहिती देण्यात आली असती", असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे. शरद पवारांशी झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली नसल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले होते.


COMMENTS