आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी बदलणे सामान्य झाले आहे. सहसा कर्मचारी राजीनामा देताना ‘करिअरची प्रगती’, ‘वैयक्तिक कारणे’ किंवा ‘नवीन संधी’ ...
आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी बदलणे सामान्य झाले आहे. सहसा कर्मचारी राजीनामा देताना ‘करिअरची प्रगती’, ‘वैयक्तिक कारणे’ किंवा ‘नवीन संधी’ अशी औपचारिक कारणे पुढे करतात.परंतु, सध्या सोशल मीडियावर एका कर्मचाऱ्याचे राजीनामा पत्र तुफान व्हायरल होत आहे, ज्याने कोणतीही फसवणूक किंवा खोटे कारण न सांगता अगदी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे आपले मत मांडले आहे. त्याचे हे पत्र वाचून नेटकरी लोटपोट झाले असून अनेकांनी त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.
काय आहे पत्रात?
ऐश्वर्या गुप्ता या एचआर कन्सलटंटने तिच्या लिंक्डइन अकाउंटवर आपल्या ‘रेझिग्नेशन सिरीज’ अंतर्गत हे पत्र शेअर केले आहे. ‘फरहान’ नावाच्या या कर्मचाऱ्याने अत्यंत सुंदर हस्ताक्षरात, हिंदी भाषेत केवळ दोन ओळींचा राजीनामा लिहिला आहे.याबाबतचे वृत्त ‘न्यूज१८’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
फरहानने पत्रात लिहिले आहे –
“डिअर सर, समोरची कंपनी शनिवार, रविवार सुट्टी आणि २ पैसे जास्त देत आहे, त्यामुळे मी विकलो गेलो आहे. युवर्स सिन्सियरली, फरहान.”
नेटकऱ्यांकडून पत्रावर प्रतिक्रियांचा पाऊस
हे पत्र सोशल मीडियावर येताच काही वेळातच व्हायरल झाले. कॉर्पोरेट जगतातील दिखाऊपणा बाजूला सारून फरहानने जे वास्तव मांडले, ते पाहून नोकरदार वर्गाने त्याचे जोरदार समर्थन केले आहे. अनेक युजर्सनी फरहानच्या राजीनाम्यासोबतच त्याच्या स्वच्छ आणि वळणदार हस्ताक्षराचे विशेष कौतुक केले. एका युजरने लिहिले, “राजीनामा तर ठीक आहे, पण याचे हस्ताक्षर मनाला भुरळ पाडणारे आहे.” दुसऱ्या एका युजरने उपरोधिक टोला लगावत लिहिले, “लिंक्डइनवर सगळे ‘करिअर ग्रोथ’ बद्दल बोलतात, पण खरी वास्तविकता हीच आहे की लोकांना जास्त पगार आणि शनिवार-रविवार सुट्टी हवी असते.”
“भावाने थेट मनातील गोष्ट बोलून सर्वांची मने जिंकली आहेत, त्याला माझा कडक सॅल्यूट,” अशी कमेंट एकाने केली. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “कधीकधी राजीनामा देणे हा कंपनीसाठी सर्वात प्रामाणिक परफॉर्मन्स रिव्ह्यू/कामाचे मूल्यमापन ठरतो.”
वर्क-लाइफ बॅलन्सची गरज
या पत्राने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे, तो म्हणजे ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ (काम आणि वैयक्तिक आयुष्याचा ताळमेळ). कंपन्या कितीही मोठ्या गप्पा मारत असल्या, तरी कर्मचाऱ्यांसाठी शेवटी चांगली आर्थिक वाढ आणि आठवड्याअखेर मिळणाऱ्या सुट्ट्या या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. फरहानच्या या ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ राजीनाम्याने सध्या इंटरनेटवर सर्वांचेच मनोरंजन केले आहे आणि एक नवी चर्चा सुरू केली आहे.


COMMENTS