मागचे काही दिवस शांत झालेला इराण-अमेरिकेमधला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. सीझफायरची घोषणा झाल्यानंतर इराणने पहिल्यांदाच कुवेत इंटरनॅशनल एयर...
मागचे काही दिवस शांत झालेला इराण-अमेरिकेमधला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. सीझफायरची घोषणा झाल्यानंतर इराणने पहिल्यांदाच कुवेत इंटरनॅशनल एयरपोर्टवर मिसाईल हल्ला केला आहे. सीझफायरची घोषणा झाल्यानंतर हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.
या हल्ल्यामुळे पश्चिम आशियामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टर्मिनल 1 ला लक्ष्य करण्यात आलं आहे. इराणने टर्मिनल 1 वर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले आहेत, ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत, तसंच विमानतळाच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या हल्ल्यानंतर सर्व विमानसेवा तात्काळ स्थगित करण्यात आल्या आहेत.
कुवेत विमानतळावर इमरजन्सी
विमानतळावर इमरजन्सी लागू करण्यात आली असून प्रवासी, कर्मचारी आणि विमानतळावरच्या सुविधांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असं कुवेतच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (PACA) ने सांगितलं आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल सौद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांनी या हल्ल्याचे वर्णन "इराणची गुन्हेगारी आक्रमकता" असे केले आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ संकुलाचे मोठे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
टर्मिनल 1 वर हल्ला
अधिकाऱ्यांनी सांगितले की, टर्मिनल 1 वरील ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतर हवाई वाहतूक पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. अनेक विमाने जवळच्या इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. तांत्रिक आणि सुरक्षा यंत्रणा नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने इराणने आखाती प्रदेशात केलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे. यूएस सेंट्रल कमांडच्या (सेंटकॉम) मते, प्रादेशिक देश आणि अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करणारे इराणचे अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरले.
इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट
सेंटकॉमने असेही म्हटले आहे की, कुवेतमध्ये अमेरिकी सैन्याला लक्ष्य करणारा एक ड्रोन पाडण्यात आला. प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकेच्या लष्कराने "आत्मसंरक्षणासाठी" इराणच्या केशम बेटावर हल्ले केले. तसंच अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्याचा इराणचा दावाही अमेरिकेने फेटाळून लावला आहे. बहरीनमधील अमेरिकेन नौदलाच्या पाचव्या ताफ्याचे मुख्यालय आणि आणखी एका एयरबेसला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इराणने केला होता. या दाव्यात तथ्य नसल्याचं अमेरिकेने सांगितलं आहे.


COMMENTS