नारायणगाव (जुन्नर) : अवघ्या अडीच वर्षांच्या आर्या भालेराव या चिमुकलीने विषारी नागाच्या दंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत येत जीवनावर ...
नारायणगाव (जुन्नर) : अवघ्या अडीच वर्षांच्या आर्या भालेराव या चिमुकलीने विषारी नागाच्या दंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत येत जीवनावर पुन्हा हक्क मिळवला आहे. कुटुंबीयांची कमालीची तत्परता आणि नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होमचे डॉ. सदानंद राऊत व डॉ. सौ.पल्लवी राऊत यांच्या अथक व कौतुकास्पद प्रयत्नांमुळे हा वैद्यकीय चमत्कार घडून आला आहे.
गुरुवारी ( दि.१८) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आर्या आपल्या वडिलांसोबत जमिनीवर झोपली असताना अचानक जोरजोरात ओरडू लागली. वडिलांनी पाहिले असता जवळच एक विषारी नाग होता, ज्याने मुलीच्या उजव्या हाताला दंश केला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी अजिबात वेळ न घालवता तिला तातडीने रुग्णालयात नेले. सर्पदंशानंतर अवघ्या ४५ मिनिटांत ती रुग्णालयात दाखल झाली.
रुग्णालयात पोहोचेपर्यंत आर्याची प्रकृती कमालीची खालावली होती. तिला गुंगी येत होती, बोलता येत नव्हते आणि उलट्या सुरू झाल्या होत्या. रुग्णालयात पाऊल ठेवताच तिची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली. हृदय आणि श्वसनक्रिया पूर्णपणे बंद झाली होती. शरीर थंड पडले होते, नाडी आणि हृदयाचे ठोके लागत नव्हते, तर डोळ्यांच्या बाहुल्या स्थिर झाल्या होत्या.
अशा कठीण प्रसंगी क्षणाचाही विलंब न करता डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांनी तातडीने सीपीआर (CPR) सुरू केला. आर्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पुढील दीड तासात तिला तब्बल तीन वेळा हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला, मात्र डॉक्टरांच्या जिद्दीपुढे मृत्यूलाही मागे हटावे लागले. प्रत्येक वेळी डॉक्टरांनी तिचे हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले.
या जीवन-मृत्यूच्या थरारक लढाईत डॉ. ऋचा मते, डॉ. अजय मते, डॉ. योगेश पाटील आणि नर्सिंग होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. आपत्कालीन उपचारांसोबतच अवघ्या २० ते ३० मिनिटांत चिमुकलीला ३० अँटी-स्नेक व्हेनम (ASV) इंजेक्शन्स देण्यात आली. सायंकाळपर्यंत चिमुकलीच्या पापण्यांची आणि जिभेची हालचाल सुरू झाली आणि विषाचा प्रभाव कमी होत असल्याचे संकेत मिळाले.
अवघ्या २४ तासांत मृत्यूला चकवा
डॉक्टरांचे प्रयत्न आणि चिमुकलीच्या जगण्याच्या जिद्दीमुळे अवघ्या २४ तासांत तिची प्रकृती आश्चर्यकारकरित्या सुधारली. ती पूर्ण शुद्धीत आली असून तिने हातपाय हलवण्यास सुरुवात केली आहे. तिला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरूनही काढण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून उलटीमुळे फुफ्फुसात अन्न गेल्याने झालेल्या अॅस्पिरेशन न्यूमोनियावर आणि हाताच्या सुजेवर उपचार सुरू आहेत. तिची न्यूरोलॉजिकल सुधारणा अत्यंत समाधानकारक आहे.
सर्पदंशानंतर कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता तातडीने रुग्णालयात पोहोचणे हाच जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. योग्य वेळी मिळालेले अँटी-स्नेक व्हेनम आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) गंभीर रुग्णालाही बरे करू शकते , अशी माहिती डॉ सदानंद राऊत यांनी दिली.


COMMENTS