जुन्नर:जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुभाजकांमध्ये (डिवायडर) लावलेली फुलझाडे आणि झुडपे सध्या पायी चालणाऱ्या नागरिका...
जुन्नर:जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुभाजकांमध्ये (डिवायडर) लावलेली फुलझाडे आणि झुडपे सध्या पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. या झाडांची वेळेवर छाटणी न झाल्यामुळे त्यांची उंची प्रमाणाबाहेर वाढली आहे. परिणामी, रस्ता ओलांडताना नागरिकांना पलीकडच्या बाजूने येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.शहरातील प्रमुख मार्गांवरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या या शोभिवंत झाडांमुळे रस्त्याला चांगला लूक आला असला, तरी सध्याच्या स्थितीत ही झाडे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला बाधा आणत आहेत. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना रस्ता ओलांडताना समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा अंदाज येत नाही. दुसरीकडे, वाहनचालकांनाही दुभाजकाच्या मधून अचानक समोर येणारे पादचारी दिसत नसल्याने अनेकदा ऐनवेळी ब्रेक दाबावा लागतो, ज्यामुळे पाठीमागून येणारी वाहने आदळण्याची शक्यता असते.स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे या वाढलेल्या झाडांची तातडीने छाटणी करण्याची मागणी केली आहे. सौंदर्यकरणासोबतच जनतेची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याने, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन या झाडांची उंची कमी करावी, जेणेकरून रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना दोन्ही बाजूंचा रस्ता स्पष्ट दिसेल आणि संभाव्य अपघात टाळता येतील.

COMMENTS