Crime News : मध्य प्रदेशातील एका राजघराण्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने गुरुवार...
Crime News : मध्य प्रदेशातील एका राजघराण्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने गुरुवारी (11 जून) रक्तरंजित वळण घेतले. मध्य प्रदेशातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार नागेंद्र सिंह यांचे नातेवाईक रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या दोन पत्नींमध्ये हा वाद झाला.त्यांची पहिली पत्नी सुनीता सिंह आणि दुसरी पत्नी योगिता सिंह यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता, ज्याचा शेवट गोळीबारात झाला.
रायफलने केला गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, योगिता सिंह या दोन दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसह हा वाद मिटवण्यासाठी परसमनिया गढी येथे पोहोचल्या होत्या. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असताना अचानक वाद वाढला. रागाच्या भरात सुनीता सिंह यांनी आपली परवानाधारक 22 बोअरची रायफल काढून अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सुमारे नऊ राऊंड फायरिंग करण्यात आले, ज्यापैकी एक गोळी योगिता सिंह यांच्या पोटात लागल्याने त्या जागीच कोसळल्या.
पोटात लागली गोळी
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि जखमी योगिता सिंह यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रीवा येथील विंध्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढली आहे. सध्या त्या अतिदक्षता विभागात (ICU) असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
पहिली पत्नी ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी सुनीता सिंह यांना ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली रायफलही जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हा वाद संपत्ती किंवा कौटुंबिक कारणांमुळे असल्याचे दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास करत असून, नेमक्या कोणत्या कारणाने हा वाद इतका टोकाला गेला, याचा शोध घेतला जात आहे. सध्या परसमनिया गढीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.


COMMENTS