हरियाणातील पानिपत जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील एका वेस्ट कपड्यांच्या गोदामात खेळता खेळता तीन...
हरियाणातील पानिपत जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील एका वेस्ट कपड्यांच्या गोदामात खेळता खेळता तीन निष्पाप चिमुरड्यांवर कपड्यांचा एक अवाढव्य ढीग कोसळला.या दुर्दैवी अपघातात दोन लहान मुलींचा गुदमरून जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिन्ही मुली आपल्या आईसोबत गोदामात आल्या होत्या, जिथे त्यांच्या आई कपडे वर्गीकरणाचे काम करत होत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
आई कामात व्यस्त, मुली लपाछपीत दंग
मिळालेल्या माहितीनुसार, पानिपतच्या भैंसवाल रोडवरील 'श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस' या वेस्ट कपड्यांच्या गोदामात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मूळची उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील असलेली गुड्डी ही आपली साडेचार वर्षांची मुलगी प्रज्ञा हिला घेऊन कामावर आली होती. तर स्थानिक कच्चा कॅम्प परिसरातील रामा (मुलगी सोनम, वय २.५ वर्षे) आणि नीलम (मुलगी रोशनी, वय ५ वर्षे) या देखील तिथे कपडे वेगळे करण्याचे काम करत होत्या. आया कामात व्यस्त असताना, या तिन्ही चिमुरड्या गोदामातच एकमेकांसोबत लपाछपी खेळू लागल्या.
अचानक मुली दिसेनाशा झाल्या अन्...
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक या तिन्ही मुली आजूबाजूला दिसेनाशा झाल्या. आयांनी काम थांबवून त्यांची शोधाशोध सुरू केली. गोदामाचा कोपरा न् कोपरा शोधूनही मुली सापडत नव्हत्या. सुमारे अर्ध्या तासाच्या शोधाशोधानंतर, गोदामाच्या आत कपड्यांचा एक मोठा ढीग कोसळलेला दिसला. संशय आल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने तो ढीग हटवण्यास सुरुवात केली. कपडे बाजूला करताच समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या तिन्ही मुली त्या ढिगाऱ्याखाली निपचित पडल्या होत्या.
दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत
मुलींना तातडीने बाहेर काढून कुटुंबीयांनी पानिपतच्या नागरी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी अडीच वर्षांची सोनम आणि साडेचार वर्षांची प्रज्ञा यांना मृत घोषित केले. तर पाच वर्षांची रोशनी अजूनही मृत्यूशी झुंज देत असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
"मी आईला खूप आवाज दिला, पण..."
या दुर्घटनेतून सुदैवाने वाचलेल्या पाच वर्षांच्या रोशनीने रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. रोशनी म्हणाली, "आम्ही तिघी जणी कपड्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये असलेल्या एका रिकाम्या जागेत लपून खेळत होतो. तेवढ्यात अचानक आमच्यावर वरून कपड्यांचा खूप मोठा ढीग कोसळला. आतमध्ये आम्हाला श्वास घेता येत नव्हता आणि अंधार झाला होता. मी माझ्या आईला वाचवण्यासाठी खूप वेळा मोठ्याने हाका मारल्या, पण आमचा आवाज बाहेर जाऊ शकला नाही."


COMMENTS