मागील काही दिवसापासून देशात महागाईच्या अक्षरशः भडका उडालेला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्...
मागील काही दिवसापासून देशात महागाईच्या अक्षरशः भडका उडालेला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. आता देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.काही आठवड्यांपूर्वीच अमूल, मदर डेअरीसह अनेक प्रमुख डेअरी कंपन्यांनी दुधाच्या किमती वाढवल्यानंतर आता पुन्हा दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे ‘एल निनो’चा संभाव्य प्रभाव आणि मान्सूनबाबतची अनिश्चितता हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
दूध उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यातच दुधाच्या किमतींमध्ये २ ते ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, जर येत्या काही दिवसात कमी पाऊस पडला आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली, तर जुलै-ऑगस्टमध्ये दुधाचे दर आणखी वाढू शकतात.
सामान्यतः पावसाचे प्रमाण घटल्यास हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होते. याशिवाय, पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास पशुपालकांना जनावरांचे संगोपन करणे कठीण जाते. परिणामी, अनेक शेतकरी जनावरांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि बाजारात पुरवठा घटल्याने दुधाच्या किमती वाढतात. Milk Price
याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख डेअरी कंपन्यांनी आधीच दुधाच्या दरात २ ते ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. तर, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे तामिळनाडूमधील ‘आविन’ डेअरीलाही दुधाचा पुरवठा कमी करावा लागला आहे.
दुधाच्या किमतीत आणखी ४ टक्क्यांपर्यंत वाढ?
‘गो चीज’ आणि ‘गोवर्धन’ ब्रँडची उत्पादक कंपनी पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांच्या मते, प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये पाऊस कमी राहिला, तर जुलैपर्यंत दुधाच्या दरात आणखी ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पशुपालकांना चारा पिकांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अनेक डेअरी कंपन्यांनीही शेतकऱ्यांसोबत चारा व्यवस्थापनाच्या विशेष योजना सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही एल निनोमुळे भविष्यात चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले असून, पशुपालकांनी आतापासूनच चाऱ्याचा साठा आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. Milk Price
दरम्यान, प्रमुख डेअरी कंपन्यांनी सध्या घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. Amul ने मान्सूनचे पुढील अपडेट्स लक्षात घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या मते, सध्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर नसून एल निनोचा दुधाच्या उपलब्धतेवर लगेच परिणाम होईल असं नाही. तसेच, मदर डेरीनेही त्यांच्या खरेदी क्षेत्रातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून, आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगितले आहे.


COMMENTS