सोलापूर:सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. प्रेयसीच्या पतीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्...
सोलापूर:सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे.
प्रेयसीच्या पतीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा भावजीही गंभीर जखमी झाला आहे.
काय घडलं नेमकं?
सिद्धाराम कैलास कटप (वय 20, रा. आकाशवाणी केंद्र, सोलापूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धाराम हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर आरोपीचा नाव संतोष महादेव पाटील (वय 19, रा. कलावती नगर) असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी संतोष पाटील याचे सिद्धारामच्या पत्नीसोबत विवाहपूर्व प्रेमसंबंध होते. याच कारणावरून शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आरोपी संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीसमोर भेटायला बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी संतोषने सोबत आणलेल्या कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला.
मध्यस्थीकरण्यावर देखील केले वार
सिद्धारामवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सिद्धराम आणि आरोपी संतोष या दोघांचा वाद सोडवण्यासाठी आणि सिद्धारामला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे भावजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMENTS