पंजाबमधील खन्ना येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित जोडप्याने अवघ्या २४ तासांच्या अंतराने आत...
पंजाबमधील खन्ना येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित जोडप्याने अवघ्या २४ तासांच्या अंतराने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. लग्नाला अवघे पाच महिने झाले असतानाच या जोडप्याने हे पाऊल उचलले.या प्रकरणात एका नातेवाईक महिलेच्या छळाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले, तर पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही दुसऱ्याच दिवशी जीव दिला. याप्रकरणी खन्ना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
पंजाबच्या खन्ना येथील बुथगढ गावात ही दुर्दैवी घटना घडली. गुरकरमदीप सिंग (वय ३४, व्यवसाय- आर्किटेक्ट) आणि जस्मिन नागरा (वय २४) अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि ते सुखाचा संसार करत होते.
सदर खन्ना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरकरमदीप सिंग याने रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. पतीच्या अकस्मात निधनाने जस्मिनला प्रचंड मानसिक धक्का बसला. पतीच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने तिनेही सोमवारी टोकाचे पाऊल उचलले. तिला तातडीने पतियाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. “पतीशिवाय मला जगायचे नाही,” असे तिने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांना सांगितले होते.
महिलेच्या छळाला कंटाळून उचलले पाऊल
या दुहेरी आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. गुरकरमदीपच्या आई छिंदरपाल कौर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खन्ना पोलिसांनी मंगळवारी नवजोत कौर नावाच्या विवाहित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. नवजोत कौर ही त्यांच्याच गावातील असून दूरची नातेवाईक असल्याचे समजते.
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची भीती आणि पैशांची मागणी
छिंदरपाल कौर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, लग्नापूर्वी गुरकरमदीप आणि नवजोत यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, पाच महिन्यांपूर्वी जस्मिनसोबत लग्न झाल्यानंतर गुरकरमदीपने नवजोतसोबतचे सर्व संबंध तोडले होते आणि तो आपल्या नवीन संसारात सुखी होता.
“संबंध तोडल्यानंतरही नवजोत गुरकरमदीपला सतत फोन करून मानसिक त्रास देत होती. ती त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पैसे न दिल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि धमक्यांमुळे गुरकरमदीप प्रचंड तणावाखाली होता,” असे त्याच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी महिला फरार, पोलिसांकडून शोध सुरू
मृत्यूपूर्वी गुरकरमदीपने आपल्या कुटुंबाला या मानसिक छळाबाबत सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी महिला नवजोत कौर सध्या फरार आहे. तिला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून ठिकठिकाणी छापे टाकले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे बुथगढ गावावर शोककळा पसरली आहे.


COMMENTS