उंडवडी : पत्नीला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक...
उंडवडी : पत्नीला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सुपा परिसरात घडली. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. उंडवाडी, ता. बारामती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ओंकार प्रकाश भोसले व तन्मेष सुधीर साळुंखे (दोघे रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी (ता. ६) सायंकाळी ऋषिकेश याला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसवून पुण्याच्या दिशेने नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकविताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला.
यानंतर आरोपींनी त्याला दिवे घाटाच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केली. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ऋषिकेश याने तेथून सुटका करून घेत मित्रांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक फौजदार जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे.


COMMENTS