कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असलेल्या निष्पाप पत...
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असलेल्या निष्पाप पत्नीचा पतीने अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.
संतोष पटायात असे या आरोपी पतीचे नाव असून, पोलिसांनी त्याला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रेमसंबंधांसाठी रचलेला हा थरारक कट आणि त्यानंतर पोलिसांसमोर आलेले सत्य यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विधवेशी प्रेमसंबंध
आरोपी संतोष पटायात याचा विवाह नऊ वर्षांपूर्वी गोकाक तालुक्यातील सक्कुबाई हिच्याशी झाला होता. संसाराचे दिवस सुरळीत सुरू असतानाच, गेल्या चार वर्षांपासून संतोषचे गावातील एका विधवा महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. प्रेयसीसोबत राहण्याच्या इच्छेपोटी संतोषने आपल्या निष्पाप पत्नीला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा एक भयानक कट रचला.
अधिक मासाच्या निमित्ताने
आपल्या क्रूर कटाची अंमलबजावणी करण्यासाठी संतोषने सध्या 'अधिक मास' सुरू असल्याचे सांगून पत्नीला चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला नेण्याचे ठरवले. भोळीभाबडी सक्कुबाई पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आनंदाने मंदिराकडे रवाना झाली. देवीचे दर्शन घेऊन परतत असताना, संतोषने तिला देवाचा 'प्रसाद' म्हणून प्यायला ज्यूस दिला. या ज्यूसमध्ये त्याने आधीच उंदीर मारण्याचे औषध (विष) मिसळले होते. ज्यूस पिताच सक्कुबाई बेशुद्ध झाली, त्यानंतर संतोषने तिला रस्त्याच्या कडेला नेऊन तिचा गळा आवळून खून केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतः पोलिसांना फोन करून पत्नीचा अपघात झाल्याचा बनाव रचला.
अपघाताचा बनाव
सक्कुबाईचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना संतोषच्या अपघाताच्या कहाणीवर संशय आला. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (BIMS) येथे पाठवला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सक्कुबाईचा मृत्यू अपघाताने नव्हे, तर गळा दाबल्यामुळे म्हणजेच हत्येमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारे पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. दरम्यान, या संपूर्ण कटामध्ये त्याच्या प्रेयसीचा काही सहभाग होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


COMMENTS