'लापता लेडीज' या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता सतेंद्र सोनीने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने व्हिडिओत रडत रडत सांगितले ...
'लापता लेडीज' या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता सतेंद्र सोनीने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने व्हिडिओत रडत रडत सांगितले की, चित्रपट निर्मात्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला आहे.याशिवाय दिग्दर्शकाने फसवणूक केल्याचंही त्याने सांगितलं आहे. सतेंद्रसोबत त्याचे इतर दोन मित्रही होते. मात्र, सुदैवाने काही वेळातच अभिनेत्याला पोलिसांची मदत मिळाली असून, तो सुरक्षित असल्याचा अपडेटही त्याने स्वतः शेअर केला आहे.
सतेंद्र सोनीने चित्रपट दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एक व्हिडिओ शेअर करत त्याने सांगितले की, काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याने पैशांची मागणी केली, तेव्हा दिग्दर्शकाने त्याला धमकावले, भररस्त्यात मारहाण केली आणि त्याचा मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अभिनेता सतेंद्र सोनीने रडत रडत व्हिडिओ बनवून सांगितले, "माझे नाव सतेंद्र सोनी आहे, मी एक अभिनेता आहे आणि मी इथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो होतो. चित्रपटाचे नाव 'पेट पालकी' असे आहे. त्यांनी आधी आम्हाला ५० हजार रुपये साइनिंग अमाऊंट दिली होती."
दिग्दर्शकाने केली फसवणूक!
व्हिडिओमध्ये त्याने पुढे सांगितले की, "त्यानंतर त्यांनी सांगितले होते की शूटिंग संपल्यावर बाकीचे पैसे दिले जातील. आज शूटिंगला आठ दिवस झाले आहेत आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे पैशांबद्दल बोललो, तेव्हा त्यांनी माझे सामान फेकून दिले आणि सांगितले की तुम्ही लोक हॉटेलमध्ये दिसता कामा नये. तसेच ते आम्हाला मारण्याची धमकीही देत आहेत."
सोशल मीडियावर लोकांनी सतेंद्रचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला, ज्याची दखल घेत त्याला तात्काळ पोलिसांची मदत मिळाली. काही तासांनंतर त्याने स्वतः एक नवा व्हिडीओ शेअर केला की तो आता सुरक्षित असून मुंबईला परत पोहोचला आहे. यामध्ये मैहर भागातील पोलिसांनी त्याला मदत केली.
कोण आहे सतेंद्र सोनी?
सतेंद्र सोनी हा मध्य प्रदेशातील सिहोरा गावातील रहिवासी आहे. अनेक वर्षांपूर्वी त्याने मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले. त्याचे वय २६ वर्षे असून तो अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग राहिला आहे. त्याला खरी ओळख 'लापता लेडीज'मधील 'छोटू' या भूमिकेमुळे मिळाली. मात्र, त्याने आपल्या करिअरची सुरुवात 'द कपिल शर्मा शो'मधून केली होती. याशिवाय तो 'अब तो भगवान भरोसे', 'मिर्झापूर' वेब सिरीज आणि 'वनवास' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे.


COMMENTS