आफ्रिकेतील इबोला उद्रेकामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. सुमारे ३.६ अब्ज डॉलरपर्यंतचे नुकसान होण्याची शक्यता असून ३.२१ लाखापेक्षा जास्त न...
आफ्रिकेतील इबोला उद्रेकामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. सुमारे ३.६ अब्ज डॉलरपर्यंतचे नुकसान होण्याची शक्यता असून ३.२१ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या संकटात आल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाकडून (यूएनडीपी) देण्यात आला आहे.काँगो सरकारच्या माहितीनुसार, १५ मे रोजी 'बुंडिबुग्यो' प्रकारच्या इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची घोषणा करण्यात आली होती. या प्रकारावरील कोणतीही प्रमाणित लस किंवा निश्चित उपचार सध्या उपलब्ध नाहीत. उद्रेकामुळे आतापर्यंत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये १,३०७ जणांना संसर्ग झाला असून ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे. युगांडामध्येही काही रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा आजार दक्षिण सुदानसह इतर शेजारील देशांमध्ये पसरण्याचा धोका आहे.
काँगोमधील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे निवासी प्रतिनिधी डेमियन मामा यांनी सांगितले की, पुरेशा आर्थिक आणि वैद्यकीय संसाधनांच्या मदतीने वेळीच उपाययोजना केल्यास या उद्रेकावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, तसे न झाल्यास ही आरोग्य आणीबाणी संपूर्ण प्रदेशासाठी दीर्घकालीन विकास संकटात बदलू शकते.


COMMENTS