मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन व आदर्श जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली...
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन व आदर्श जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत.लग्नावेळी घरातून झालेला विरोध, वयात अंतर, दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्राने दिलेली खंबीर साथ असे सगळे चढउतार या दोघांनी एकत्र पाहिले. आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण होताच निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर करत अशोक सराफांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी या दोघांची लव्हस्टोरी सांगितली होती, याबाबत जाणून घेऊयात…
सचिन पिळगांवकर तारांगणला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, "सर्वात महत्त्वाची जोडी मी जमवली.. ती म्हणजे अशोक आणि निवेदिता. अशोक लग्नाला नाहीच म्हणत होता, लग्न वगैरे काही नकोय असं त्याचं म्हणणं होतं. त्याआधी त्याचा अपघात झाला होता, त्यामुळे तो अत्यंत त्रासात होता. त्याला दुखापत झाली होती…त्यातून तो हळुहळू सावरत होता. काम सुरू केल्यामुळे त्याला कामाच्या माध्यमातून एक वेगळं समाधान मिळत होतं. एकंदर काम करून तो खूश होता, कामात अतिशय व्यग्र होता. मग मी त्याची समजूत काढली होती. कारण, निवेदिताला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. बरं दुसऱ्या बाजूला निवेदिताची आई या लग्नाच्या अतिशय विरोधात होती. मग अशोक आणि मावशी या दोघांची समजूत काढत शेवटी २७ जून १९८९ मध्ये हे लग्न झालं."
अशोक व निवेदिता यांचं लग्न गोव्यात पार पडलं. दोघांच्या वयात जवळपास १८ वर्षांचं अंतर होतं. हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पण, निवेदिता खूपच ठाम होत्या. यावेळी निवेदिताला मोठ्या बहिणीने म्हणजेच डॉ. मीनल परांजपे यांनी मदत केली होती. त्यांनी कुटुंबीयांचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
गोव्यात लग्न केलं कारण…
लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता यांनी त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. गोव्यात मंगेशीच्या देवळात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. अशोक सराफ यांच्या आईची या जोडप्याचं मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती. या दोघांच्या लग्नाचा साग्रसंगीत सोहळा पार पडला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवेदिता यांचा भाऊ म्हणून सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ यांचा कान पिळला होता.
आज लग्नाला ३७ वर्षे पूर्ण होताच निवेदिता सराफ लिहितात, "आज ३७ वर्षांनंतरही तुझ्याकडे पाहताना माझं मन तेवढंच आनंदी होतं…माझा जिवलग मित्र, माझी ताकद आणि तू माझं प्रेम आहेस…लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!"
दरम्यान, या पोस्टवर मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


COMMENTS