Property Card Online - भूमिअभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिकेवरील खरेदी नोंदी, वारसनोंदीसाठी ईप्सित ही संगणक प्रणाली ला...
Property Card Online - भूमिअभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिकेवरील खरेदी नोंदी, वारसनोंदीसाठी ईप्सित ही संगणक प्रणाली लागू केली आहे. या सुविधेद्वारे आतापर्यंत एक लाख ४० हजारपेक्षा अधिक फेरफार निकाली काढण्यात आले आहे.या प्रणालीमुळे नागरिकांना नोंदीसाठी आता नगर भूमापन कार्यालयात अथवा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येत आहे.
भूमिअभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, आदींसाठी ई हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्याच धर्तीवर आता ईप्सित म्हणजेच इलेक्ट्राॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणक प्रणाली तयार केली असून या mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे, तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यापूर्वीच सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे ९१ लाख मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. शहरांमध्ये मिळकतींचा खरेदी- विक्री झाल्यानंतर त्यांची नोंद प्रॉपटी कार्डवर घेण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जावे लागत होते.
आता ईप्सित प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या अर्ज करता येत आहे. यामुळे नागरिकांची वेळेची बचत होणार आहे. नागरिकांना त्यांच्या अर्जावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे, हे शोधण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येण्यासोबतच, प्रत्येक टप्प्याची माहिती एसएमएसद्वारे वेळेवर दिली जात आहे.
यासाठी करता येणार ऑनलाइन अर्ज
प्रॉपर्टी कार्डवरील वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासह खरेदी नोंदीसाठी, बक्षीसपत्र नोंदी, गहाणखत, बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, मृत्यूपत्र नोंद घेणे आणि हक्कसोड पत्रानुसार नोंदी करणे आदींसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.


COMMENTS