सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डी-मार्टसमोर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेन...
सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डी-मार्टसमोर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘कसाब’ गावचे रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते. सातारा परिसरातील डी-मार्टजवळ आले असता, त्यांच्या मिनी बसला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की मिनी बसचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले.
तात्काळ उपचार सुरू: शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे सर्व पाचही जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे कसाब गावावर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS