अकोला : जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मा...
अकोला : जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे.(Soybean Market)
कारण बहुतांश शेतकऱ्यांनी कमी भावामुळे यापूर्वीच आपला माल विकून टाकला असून सध्या साठवणुकीत सोयाबीन शिल्लक नसल्याने वाढीव दराचा लाभ त्यांना मिळत नाही.(Soybean Market)
गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन बाजारात येत असताना शेतकऱ्यांना केवळ ४,५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी काही काळ माल साठवून ठेवला. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांपर्यंतही दरात अपेक्षित सुधारणा झाली नाही. परिणामी आर्थिक गरजेमुळे अनेक शेतकऱ्यांनी ४,५०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटल दरानेच सोयाबीन विक्री केली.(Soybean Market)
यानंतर फेब्रुवारीपासून बाजारातील परिस्थिती बदलू लागली. देशांतर्गत आवक कमी होत गेली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोयापेंड (ढेप) तसेच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळाला आणि मागील दोन महिन्यांपासून बाजारात ६,००० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळू लागला आहे.(Soybean Market)
उत्पादन घटल्याने आवक कमी
यंदा देशातील अनेक भागांमध्ये सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. सरासरी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये मालाची आवक घटली. दुसरीकडे सोयाबीन तेल आणि सोयापेंडची मागणी कायम असल्याने बाजारात पुरवठा-मागणीचे समीकरण बदलले.
मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थिती, जागतिक बाजारातील चढ-उतार आणि निर्यातीशी संबंधित घडामोडींचाही परिणाम दरवाढीवर झाला असल्याचे व्यापारी सांगतात.
आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने सोयाबीनच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांतील उच्चांकी दर सध्या शेतमालाला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला बाजार समितीत आवक मर्यादित
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या दररोज सरासरी १,२०० ते १,५०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. शुक्रवारी बाजार समितीत १,२१८ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. यावेळी सोयाबीनला ४,८५० ते ६,९१५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर १८ जून रोजी १,५८६ क्विंटल आवक झाली होती. त्या दिवशी ६,००० ते ६,८९५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची नोंद आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात उपलब्ध मालाचे प्रमाण कमी असल्यामुळे गुणवत्तापूर्ण सोयाबीनला अधिक मागणी असून पुढील काही दिवस दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच
सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी सामान्य शेतकऱ्यांच्या हातात विक्रीसाठी फारसा माल उरलेला नाही. आर्थिक अडचणी, कर्जफेड आणि शेतीखर्च भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना हंगामातच माल विकावा लागला होता. त्यामुळे सध्याच्या वाढीव दराचा लाभ व्यापारी, मोठे साठवणूकदार आणि काही मोजक्या शेतकऱ्यांनाच मिळत आहे.
शेतकरी संघटनांच्या मते, जर हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना हमीभावाच्या जवळपास दर मिळाले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती. साठवणूक सुविधा आणि आर्थिक आधाराच्या अभावामुळे शेतकरी वाढीव दराचा फायदा घेऊ शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
यंदा सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून सोयाबीनला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे यंदा सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून कमी भावामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत होते. मात्र यंदा सात हजार रुपयांच्या जवळपास भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी पुन्हा सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याच्या तयारीत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, केवळ सध्याचा भाव पाहून पेरणीचे निर्णय घेण्याऐवजी हवामान, उत्पादन खर्च, बाजारातील मागणी आणि दीर्घकालीन दराचा कल लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.


COMMENTS