लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची तिच्या 27 वर्षीय प्रियकराने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...
लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची तिच्या 27 वर्षीय प्रियकराने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरथ असे आरोपीचे नाव असून तो शहरात पाण्याच्या टँकरचा चालक म्हणून काम करत होता.मल्लेश्वरम परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघेही भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
अनुषाचा गळा आवळून जीव घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, अनुषा आणि शरथ या दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. दोघेही हासन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी होते. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले, ज्यानंतर त्यांनी बेंगळुरू गाठले आणि मल्लेश्वरम भागात एकत्र राहण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्री दोघांमध्ये कोणत्याही कारणावरून शाब्दिक वाद झाला, जो हळूहळू विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. रागाच्या भरात शरथने अनुषाचा गळा आवळून तिचा जीव घेतला.हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी शरथ घटनास्थळीच थांबून राहिला, परंतु त्याने ही बातमी कोणालाही दिली नाही. दोन दिवस उलटल्यानंतर सोमवारी त्याने आपल्या वकिलाची भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. वकिलाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलिसांना माहिती दिली. सेशाद्रिपुरम पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घरातून अनुषाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून, प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी आरोपी शरथला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, पोलीस दोघांचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासून वाद नक्की कशावरून झाला, याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील मैत्री आणि त्यानंतरच्या नात्यांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना बंगळुरुमध्ये घडलीये.


COMMENTS