पुणे: नाणेकरवाडी (ता. खेड) येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हु...
पुणे: नाणेकरवाडी (ता. खेड) येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांना खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.आरोपीकडून कोणतीही अंमली पदार्थांची जप्ती झालेली नसल्याचा तसेच तपास जवळपास पूर्ण झाल्याचा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
नाणेकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे उघडकीस आलेल्या गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणात आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांना खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चाकण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल निखिल बाळासाहेब वरपे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, 9 मे 2026 रोजी राहुलसिंग लोधी हा बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुलसिंग लोधी यांच्या निवासस्थानी छापा टाकला असता, त्याच्या ताब्यातून 149 किलो 715 ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित अंमली बंटा गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
तपासादरम्यान राहुलसिंग लोधी हा सदर अंमली पदार्थ आरोपी दिलीप कुंदवाणी यांना विकणार असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच दोघांनी संगनमत करून हा गुन्हा केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दिलीप कुंदवाणी यांच्या वतीने ऍड. प्रसाद विराज निकम आणि ऍड. मन्सूर तांबोळी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यानऍड. प्रसाद विराज निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, जप्त करण्यात आलेला संपूर्ण अंमली पदार्थ सहआरोपी राहुलसिंग लोधी याच्या ताब्यातून मिळाला असून, आरोपी कुंदवाणी यांच्याकडून कोणतीही जप्ती अथवा वसुली झालेली नाही. तसेच आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तपास जवळपास पूर्ण झाला आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नसून खटला निकाली लागण्यास बराच कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणात ऍड. प्रसाद विराज निकम यांना ऍड. शिवानी वाघमारे, ऍड. रोहित ढोते आणि ऍड. पृथ्वीजित माने यांनी सहकार्य केले.


COMMENTS