महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (20 जून 2026) सक...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (20 जून 2026) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक दुर्घटना घडली.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पर्यटनासाठी आलेल्या 21 जणांच्या ग्रुपमधील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासोबतच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील 21 जणांचा एक ग्रुप वीकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी (20 जून 2026) सकाळी सर्व जण समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आणि समुद्राच्या पाण्याचा आनंद घेत होते. सकाळी अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास काही जण पाण्यात उतरले. मात्र, समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अचूक अंदाज न आल्यामुळे अचानक हे पाचही जण समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि पाहता पाहता बेपत्ता झाले.
कळवा, मुलुंड पुलावरील ट्रॅफिक विसरा! ठाणे-नवी मुंबई प्रवास आता सुसाट; कोपरी ते पटनी दरम्यान उभारणार 6 पदरी केबल पूल, कसा असेल प्रकल्प?
युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
लाटांचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. पर्यटक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील नागरिकांनी आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस पथक, स्थानिक मच्छीमार आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता झालेल्या पाचही पर्यटकांचा शोध घेण्यासाठी समुद्रात युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि जोरदार लाटांमुळे बचाव कार्यात काही प्रमाणात अडचणी येत आहेत.
दुःखाचा डोंगर कोसळला
सध्या बेपत्ता झालेल्या पाचही पर्यटकांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संभाजीनगरवरून आलेल्या त्यांच्या नातेवाईकांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.)
पर्यटकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजलेले आहेत, मात्र अनेकदा लाटांचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडतात. पर्यटकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि समुद्राच्या खोल पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. सध्या या घटनेबाबत अधिकृत आणि सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.


COMMENTS