जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. तालुक्यामधील कापूसवाडी गावाजवळील जंगलात ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. तालुक्यामधील कापूसवाडी गावाजवळील जंगलात एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित 40 वर्षीय महिला कापूसवाडी जवळील जंगलात तिच्या ओळखीच्या काही तरुणांसोबत बसलेली होती. ती तिथे असताना अचानक त्या ठिकाणी इतर काही तरुण आले. त्यांनी तिथे येऊन धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोघांनी महिलेवर जबरदस्तीने आळीपाळीने अत्याचार केला.
व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल
हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. पीडितेची मदत करण्याऐवजी किंवा आरोपींना रोखण्याऐवजी दोन्ही मुख्य नराधम आरोपींच्या सोबत असलेल्या इतर तरुणांनी या संपूर्ण अत्याचाराचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. इतकेच नव्हे, तर तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल देखील केला, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांची तात्काळ कारवाई आणि अटक
या संतापजनक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या संपूर्ण प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अत्याचार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींसह (युसूफ तडवी आणि अशपाक तडवी) आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
घटनेचे गांभीर्य पाहता जळगावचे पोलीस अधीक्षक (SP) श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत कठोरपणे करण्याचे आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फरार असलेल्या उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना कठोरकरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.


COMMENTS