जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एका शिक्षकाने चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मागील दो...
जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एका शिक्षकाने चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता.
आरोपीनं पीडितेला धमकी दिल्याने तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र, तिचं पोट दुखत असल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदलाल नारायण मराठे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे. तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे.
३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला होता. दरम्यान, शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलगी सुट्यांमध्ये मावशीकडे गेली होती. तिथे तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण करणं बंद केले. नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत होता. या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा आणि कोणाला सांगितल्यास तुझे आई-वडील मरून जातील, अशी धमकी देऊन तिला गप्प बसवत असे, असे संबंधित पीडित मुलीचं म्हणणे आहे.


COMMENTS