साताऱ्यातील कामथी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उरमोडी धरणालगत असलेल्या या गावात आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हॅन्डब्रेक निघाल्यान...
साताऱ्यातील कामथी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उरमोडी धरणालगत असलेल्या या गावात आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हॅन्डब्रेक निघाल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला.
या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लीलाबाई उत्तम अडागळे (वय 56), मालुबाई सीताराम अडागळे (50), कल्पना सागर आवळे (36), गार्गी सागर आवळे (वय 6) अशी त्यांची नावे आहेत. अन्य काही जखमी झाले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.
चार दिवसांवर लग्नकार्य
कामथी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील नवीन गावठाणात (पुनर्वसित गावात) निमसोड (खटाव) या ठिकाणी चार दिवसांवर लग्नकार्य आहे. यासाठी घरातील साहित्य आणि जनावरे हलवण्याचे काम दोन दिवसांपासून काम सुरू होते.
मुलाकडून हॅण्डब्रेक निघाला अन्..
शुक्रवारी (8 मे) रात्री सव्वादहाच्या दरम्यान कुटुंबातील सहा सदस्य आयशर टेम्पोत जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हॅन्ड ब्रेक निघाला व काही क्षणातच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे गेली आणि पलटी झाली. यावेळी केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.
जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर
या अपघातात वाहनातील तीन महिला व एक बालिका जागेवरच दगावली. उर्वरित सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजतात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि कासारथळ येथील युवकांनी जेसीबीने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.


COMMENTS