पिंपळवंडी (ता. जुन्नर) : पद्मश्री नारायण सुर्वे सभागृह, राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य नगरी चाळकवाडी, पिंपळवंडी येथे शिवांजली साहित्यपीठ, महार...
पिंपळवंडी (ता. जुन्नर) :
पद्मश्री नारायण सुर्वे सभागृह, राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य नगरी चाळकवाडी, पिंपळवंडी येथे शिवांजली साहित्यपीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ वा राज्यस्तरीय “शिवांजली मराठी साहित्य महोत्सव २०२६दि. १ मे ते ३ मे दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रतिष्ठित साहित्य महोत्सवात जि.प. प्राथमिक शाळा कुमशेत येथे कार्यरत असलेले अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी गावचे सुपुत्र, कविवर्य श्री. यशवंत घोडे (फोफसंडीकर) यांना “शिवांजली नवोन्मेष भूमिपुत्र सन्मान पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत मिळालेल्या या सन्मानामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कविवर्य यशवंत घोडे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ग्रंथालय निर्मिती उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीसाठी त्यांचा “अवतीभवती” हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. हा संग्रह महाराष्ट्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपर्यंत पोहोचला आहे. तसेच त्यांच्या “भावरंग बालमनाचे” आणि “निसर्गपूजक,निसर्गाचे उपासक” या काव्यसंग्रहांनाही वाचकांची विशेष पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांनाही त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत पुस्तक समीक्षा व परीक्षण स्पर्धांमध्येही त्यांना विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.
या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजेश वैरागडे सर (नागपूर), बालसाहित्यिक कैलास दौंड (पाथर्डी), पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मा. शरददादा लेंडे साहेब, शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक साहित्यिक इंजि. शिवाजीराव चाळक सर, स्तंभलेखिका गीताताई रायकरे (चंद्रपूर), सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. पुरुषोत्तम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संदीप वाघुले, प्रा. विजय लोंढे, लोक साहित्यिक प्रा. मा. रा. लामखडे, प्रा. आमले सर, बाळकृष्ण बाचल, संतोष गाढवे, प्रा केशव बोरकर, प्रा. जयसिंग गाडेकर, सुलेखनकार उमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित साहित्यिकांनी कविवर्य यशवंत घोडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत कौतुक केले.
महोत्सवात साहित्यिक मित्रपरिवारातील राजेश दुर्गुडे सर, सुरेश डुंबरे, प्रा. नागेश हुलवळे, सुनिता वामन मॅडम, संजय गवांदे सर, गणेश मोढवे, साहित्यिक उत्तम सदाकाळ सर आदी मान्यवरांनाही कलाविष्कार शिवांजली भूमिपुत्र, शिवांजली नवोन्मेष, शिवांजली सेवा आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.दि.3 मे रोजी सकाळच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन रंगले. सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण व निसर्ग विषयांवरील कविता रसिकांसमोर सादर करण्यात आल्या. उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुस्तक मुखपृष्ठ अनावरण, AI तंत्रज्ञानावरील चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखत सत्र, प्रकाशन सोहळे आणि उत्कृष्ट साहित्यकृती सन्मान अशा विविध उपक्रमांनी महोत्सवाला वैचारिक व साहित्यिक उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाबा जाधव सर, संदीप वाघुले सर व विजय लोंढे सर यांनी केले. शेवटी संस्थापक इंजि. शिवाजीराव चाळक सर यांच्या “माय मराठी” या भावस्पर्शी कवितेने महोत्सवाचा दिमाखदार आणि भावपूर्ण समारोप झाला.




COMMENTS