पुणे : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा ही समोर आली...
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा ही समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव हमीद शेख असे असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी झाला आहे. अनिकेत सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ विशाल सूर्यवंशी यांनी धारदार शस्त्राने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हमीद शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोपी विशाल सूर्यवंशी हा फरार होता त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात या हत्येमागे जुना वाद आणि एका युवतीशी संबंधित प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. हमीद शेख हा अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. चार महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो तुरुंगात होता. हमीद जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा संबंधित तरुणीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना होती. संबंधित युवतीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे काळेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


COMMENTS