सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्...
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी मुख्य ३ आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे.
ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, रा. करोली (टी) शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा युवासेना कवठे महांकाळ शहरप्रमुख आणि हर्षद दाजी पैलवान (वय ३०, रा. तासगाव/कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे (रा.मंगळवेढा) आणि अमर खताळ (रा. इचलकरंजी) हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील कोसारी येथील दादसो नामदेव यमगर (वय ५०) हे जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. ५ मे २०२६ रोजी सकाळी ते सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना, नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून (MH 13 AU 6654) आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते.
अपहरण केल्यानंतर आरोपींनी दादसो यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथणी जवळील मदभावी (निलनगे वस्ती) येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची हत्या करून, हा प्रकार खुनाचा नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या बनावाचा पर्दाफाश केला.
गुन्ह्याचा तपास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, सहा.पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अमोल शिवशरण, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, भापकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजीत कासार, गोसावी, शितल जाधव या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.
दरम्यान, जत तालुक्यातील कोसारी येथे जुलै 2023 मध्ये विहरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विलास आणि प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आणि तिचा मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहेत. या खून प्रकरणात प्रवीण यमगर फिर्यादी असून दादासो यमगर साक्षीदार आहेत. मंगळवारी प्रवीण जबाबासाठी जाणार होता त्याच्यासोबत दादासो यमगरही जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्यांना संपवून त्यांनी आत्महत्या केल्याचे दर्शवण्यात आले आहे.


COMMENTS